शेर शिवराज यांनी प्रतापगडावर अफझलखानाचा असा बाहेर काढला कोथळा!

166

पावनखिंड या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर शेर शिवराज हा चित्रपट घेऊन आले आहेत. १२ कोटीच्या पावनखिंड या चित्रपटाने साधारण ७० कोटी कमावल्याची नोंद आहे.

तुम्ही शेर शिवराज या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला असेल तर तुम्हाला माहिती असेल की, हा चित्रपट अफझलखान वधावर आधारित आहे. शेर शिवराज या चित्रपटात चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असून अफझलखानाची भूमिका ज्येष्ठ अभिनेते मुकेश ऋषी निभावत आहेत.

( हेही वाचा : पहिली एसटी कधी आणि कुठे धावली? आपल्या लालपरीचा रंजक इतिहास! )

अफझलखान वध

छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अफझलखानाचा वध ही भारतीय इतिहासातली महत्वपूर्ण घटना आहे. रणनीति, गनिमी कावा, मानसशास्त्र, प्रबळ इच्छाशक्ती, चातुर्य इ. सर्व गोष्टींचा मेळ म्हणजे अफझलखान वध.

प्रतापगडाची लढाई म्हणून इतिहासात या लढाईची नोंद आहे. शिवरायांनी स्वराज्यावर आलेले अनेक संकट परतवून लावले. त्यापैकी सर्वात बलवान संकट म्हणजे अफझलखान. अफझलखान हा खूप कपटी, शक्तिशाली आणि क्रूर होता. त्याला हरवणं जवळ जवळ अशक्यच होतं. त्या अफझलचा कोथळा महाजारांनी बाहेर काढला.

कोण होता अफझलखान?

छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केली व फतेहखानाचा पराभव देखील केला. शिवरायांनी आदिलशाहीला नामोहरण केलं होतं. यामुळे विजापूरला मान खाली घालावी लागत होती. शिवरायांना रोखणं कठीण होऊन बसलं होतं. शिवाजीराजेंचा अश्वमेध रोखण्यासाठी आदिलशाहाच्या अम्मीने म्हणजेच बड़ी बेगमने भर दरबारात आवाहन केलं, “कौन करेगा सिवाजी को कैद? कौन रोकेगा सिवा को?”

सगळा दरबार शांत होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांनीच धसका घेतला होता. स्वराज्यावर चाल करुन जाणं आणि शिवरायांशी दोन हात करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं हे अनेकांना ठाऊक होतं. पण एक सरदार पुढे आला, “मैं लाऊंगा सिवाजी को…” असं म्हटल्यावर सगळा दरबार अवाक झाला. त्याचं नाव अब्दुल्लाहखान भटारी म्हणजेच अफझलखान.

हा अफझलखान उंच धिप्पाड होता. अत्यंत क्रूर आणि पराक्रमी होता. याने शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी राजेंची हत्या केली होती. तो शहाजी राजेंचा देखील शत्रू होता. आता तो छत्रपतींच्या स्वराज्यावर स्वारी करायला निघाला.

महाराष्ट्रात खान

खान महाराष्ट्रात आल्यावर त्याने उपद्रव माजवला. पंढरपूर, माणकेश्वर, राहमतहपूर येथून तो वाईकडे आला. पूर्वी खान वाईचा सुभेदार असलेल्यामुळे त्याने छावणी वाई येथे वसवली. त्याने प्रचंड जाळपोळ केली, मंदिरे फोडली, बलात्कार, सगळीकडे हाहाकार माजवला, तुळजापूर तसेच पंढरपूर येथेही अत्याचाराची सीमा गाठली.

त्याला वाटत होतं की शिवाजी महाराज स्वतः मैदानात उतरतील. पण खानासोबत समोरासमोर लढणं कठीण होतं. त्याची फौज विशाल होती. १० हजार पायदळ, १२ हजार घोडदळ, सुमारे दीड हजार बंदूकधारी सैन्य, हत्ती, उंट त्यांच्यासोबत साधारण ९० तोफा. तसेच सय्यद बंडा, अंबरखान, सिद्दी हिलाल, मुसाखान, पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे असे प्रमुख सरदारही होते.

म्हणून छत्रपतींनी योजना आखली की खानाशी समोरासमोर युद्ध करण्याऐवजी त्याला अशा ठिकाणी आणायचं आणि त्याचा लचका तोडायचा. पुढे खानाने जंजिर्‍याच्या सिद्दीशी हातमिळवणी केली आणि कोकणाला त्याने जणू विळखाच घातला.

प्रतापगडाच्या पायथ्याशी

खान वाई येथे ठाण मांडून बसला होता. सर्वप्रथम महाराजांनी रायगड सोडला आणि ते प्रतापगडावर येऊन पोहोचले. आता महाराजांनी खानाकडे आपले दूत पाठवले आणि आपण त्याला घाबरलो आहोत असे नाट्य़ आरंभ केले. खानाची इच्छा होती की महाराजांनी त्याला वाईलाच भेट द्यावी. वाईला घातपात होऊ शकतो हे शिवछत्रपतींना ठाऊक होतं. म्हणून त्यांनी खानाला निरोप पाठवला की आपण खूपच घाबरलो आहोत. त्यामुळे खानानेच आपल्याला भेटायला यावं.

खानाचा अहंकार सुखावला, शिवाजी महाराज आपल्याला घाबरले या कल्पनेनेच तो आनंदित झाला. तो खूपच उतावीळ झाला होता. त्याने प्रतागडाच्या पायथ्याशी भेटायला होकार दिला.

नियम व अटी ठरल्या, भेटीदरम्यान दोन्हीकडचे लोक हत्यार वापरणार नाहीत, प्रत्येकाकडे केवळ १० अंगरक्षक असतील, त्यातील एक शामियान्याबाहेर थांबेल आणि बाकीचे अंगरक्षक दूर उभे राहतील. बस्स! खान पिंजर्‍यात अडकला होता. इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्ती लढवली होती. ते खानाच्या सायकोलॉजिशी खेळले होते. खान हा कुणी बडा पराक्रमी आणि आपण त्याच्यासमोर कुणी म्हणजे कुणीच नाही असं त्याला भासवलं. भेटीचा दिवस ठरला. ग्रेगोरियन कालगणनेनुसार इ.स. १० नोव्हेंबर १६५९…

३२ दातांच्या बोकडाचा बळी

शिवरायांनी मुद्दामूनच भव्य, सुंदर आणि डोळ्यांत भरुन येणारा शामियाना तयार करुन घेतला. भेटी दरम्यान शस्त्र बाळगू नये असे ठरले असले तरी खान दगा करु शकतो हे शिवरायांना माहित होतं. त्याचप्रमाणे खानाने अंगरख्याखाली बिचवा लपवला होता. हे छत्रपती ओळखून होते म्हणूनच त्यांनी अंगरख्याखाली चिलखत घातले व वाघनखे लपवली.

आता तो क्षण आला. हिंदवी स्वराज्याचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाभयाण राक्षस अफझलखान समोरासमोर उभे होते. परकीय स्त्रिला साडीचोळी देऊन तिचा सन्मान करणारे छत्रपती आणि स्त्रिजातीला तुच्छ मानून तिच्यावर अत्याचार करणारा निर्दयी अफझल यांनी एकमेकांना निरखून पाहिलं. देवदेवींना पूजणारे प्रभू रामचंद्रांसारखे भासणारे शिवछत्रपती आणि मूर्तीची विटंबना करणारा नालायक अफझल यांची भेट झाली.

उंच धिप्पाड अफझलखान आणि त्याच्यासमोर अगदीच लहान दिसणारे परंतु महापराक्रमी शिवाजी महाराज यांची गळाभेट झाली. अफझलखानाने महाराजांना आलिंगन दिले आणि बगलेत शिवरायांना दाबून बिचवा बाहेर काढून त्याने महाराजांवर वार केला. जे अपेक्षित होते तेच घडत होते. पण अफझलखानाला माहिती नव्हतं की या भारतमातेने केव्हाच रणचंडिकेचं रुप धारण केलं होतं आणि शेर शिवराज हे त्या रणचंडिकेचेच सुपुत्र होते.

शिवाजी महाराजांनी चिलखत घातले होते म्हणून त्यांना इजा झाली नाही. त्यांनी तत्काळ वाघनखे काढली आणि खानाच्या पोटात खुपसून त्याचा कोथळा बाहेर काढला. ’दगा दगा’ असा खान ओरडू लागला. अंगरक्षक सावध झाले. अंगरक्षकांमध्ये लढाई सुरु झाली. सय्यद बंडाने छत्रपतींवर वार केला परंतु शूरवीर जिवा महालाने तो वार स्वतःवर घेतला आणि शिवराय बचावले.

खान लगेच त्याच्या पालखीत बसला. पण महाराष्ट्राला खानाचे रक्त हवे होते. आई भवानीला त्या रक्ताने अभिषेक करायचा होता. संभाजी कावजीने पालखी वाहणार्‍या भोईचे पाय तोडले आणि अफझलखानाला मारुन त्याचे शीर धडापासून वेगळे केले.

जिजाऊंनी अफझलचे शीर भेट दिले

महाराज लगेच किल्ल्यावर परतले आणि हे शीर जिजाऊंना भेट म्हणून पाठवले. अफझलखानाच्या सैन्यावर आक्रमण करण्याचे आदेश त्यांनी दिले. मराठा सैन्य प्रतापगडाच्या जंगलात दबा धरुन बसलं होतं. अचानक तोफा धडाडू लागल्या. अफझलच्या सैन्याला काही कळत नव्हतं. कान्होजी जेधे यांनी आपल्या पायदळ सैन्याकडून बंदूकधार्‍यांवर आक्रमण केले आणि बाजी सर्जेराव व पिलाजी गोळे अफझलच्या सैन्यावर चालून गेले. अफझलच्या सैन्याची वाताहत झली. वाई येथे ठाण मांडून बसलेल्या सैन्यावरही नेताजी पालकर यांनी हल्ला चढवला.

खान मारला गेला, सैन्य बिथरले. स्वराज्यावर आलेलं सर्वात मोठं संकट छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी परतवून लावलं. प्रतापगडाची लढाई ही जगातील सर्वश्रेष्ठ लढाईंपैकी एक आहे. युक्ती आणि शक्ती यांचे संगम आहे.

छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय भवानी, जय शिवाजी
हरहर महादेव

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.