तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याच्या बछड्यांना आई भेटली

193

सातारा येथील कराड तालुक्यातील भोळेवाडी येथे चार दिवसांपूर्वी ऊस तोडणीच्या कामगारांना महिन्याभराचे बिबट्याचे दोन बछडे मिळाले होते. या बछड्यांजवळ आई नव्हती. या बछड्यांपासून दूरावलेल्या आईला भेटवण्यासाठी कराड वनविभागाला तीन दिवसांची कसरत करावी लागली. अखेर सोमवारी मध्यरात्री एक वाजता या दोन्ही बछड्यांचे आपल्या आईशी मिलन झाले आणि वनाधिका-यांचा जीव भांड्यात पडला.

भेट घडवण्याचा पहिला प्रयत्न फसला

भोळेवाडी येथे बिबट्यांचे दोन बछडे मिळाल्याची माहिती मिळताच, वनाधिका-यांनी घटनास्थळी भेट देऊन बछडे आपल्या ताब्यात घेतले होते. ही घटना शुक्रवारी घडली होती. आपल्या महिन्याभराच्या बछड्यांच्या दूराव्याने मादी बिबट्या आक्रमक होण्याची भीती वनाधिका-यांमध्ये होती. सावधानता म्हणून त्याच दिवशी बछड्यांचे आईसह मिलन घडवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. ज्या ठिकाणी बिबट्याचे बछडे सापडले त्याच ठिकाणी बछड्यांना वनविभागाने ठेवले. पहिल्या दिवसाचा आई आणि बछड्यांची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न फसला.

तीन दिवस महिन्याभराच्या बछड्यांचा सांभाळ

महिन्याभराच्या बछड्यांना आईपासून दूरावल्याने सांभाळणे वनाधिका-यांसाठी आव्हानात्मक होते. आईच्या दूधापासून मुकलेल्या नर आणि मादी या दोन बछड्यांचा सांभाळ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन सवने यांनी केला. पोषण आहारासह पाणी असा आहार त्यांना दिली गेला. नर बछड्याच्या शेपटीला आणि मागच्या पायाला इजा झाली होती, तो अशक्तही होता. तीन दिवसांच्या उपचारानंतर रविवारी सायंकाळी त्याच ठिकाणी बछड्यांची आईसह मिलन करण्याचा पुन्हा वनाधिका-यांनी प्रयत्न केला.

बछड्यांच्या मलमूत्रांचा वास येताच आई समोर आली

बिबट्याची बछडे सापडल्याच्या ठिकाणापासून शेजारच्या एका नांगरलेल्या शिवारात दोन्ही बछडे ठेवण्यात आले. हे बछडे एका क्रेटमध्ये ( वन्यप्राण्यांचे बछडे किंवा पिल्ले हरवल्यानंतर त्यांचे आईशी मिलन होताना ही चौकटसदृश्य वापरली जाणारी टोपली) ठेवली गेली. बाजूला ट्रेप कॅमे-याच्या साहाय्याने वनाधिकारी दोन्ही बछड्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. दोन्ही बछड्यांच्या मलमूत्राचे नमूने नजीकच्या झाडांवर व दगडांवर टाकले गेले जेणेकरुन मादी बिबट्याला तिचे दोन्ही बछडे कुठे आहेत, याची कल्पना येईल. सोमवारी दुपारी सशक्त मादी पिल्लाला वनाधिका-यांनी एक दिवसाचा उपवास दिला. सायंकाळी भूकमुळे मादी बछडी जोरात हाका मारताच आईचे लक्ष वेधले जाईल, अशी कल्पना त्यामागे होती. दोन्ही क्लुप्त्या कामी आल्या. आपल्या बछड्याच्या ओरडण्याने रात्री अकराच्या सुमारास आई आपल्या दोन्ही बछड्यांजवळ आली. मध्यरात्री दीडच्या सुमारास दोन्ही बछड्यांना घेऊन गेली.

( हेही वाचा: मुंबईतील ७२ टक्के भोंग्यांवरून सकाळचे अजान बंद )

मोहिमेतील वनाधिका-यांची टीम

सातारा वनविभागाचे (प्रादेशिक)उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक वनसंरक्षक महेश झाणझुरणें, वनक्षेत्रपाल तुषार नवले , मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे , पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चंदन सवने , वनरक्षक म्होप्रे शीतल पाटील ,उत्तम पांढरे, भरत खटावकर वनमजूर शंभू माने, वनमजूर अमोल पाटील यांनी दूरावलेल्या बछड्यांची आपल्या आईसह भेट घडवून आणली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.