मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. मशिदींवरील भोंग्यांचा इफेक्ट फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर उत्तर प्रदेशातही दिसून येत आहे. योगी सरकराने आता भोंग्यांबाबत नवी नियमावली जारी केली आहे.
म्हणून योगी सरकारचा मोठा निर्णय
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर नोएडातील 602 मंदिरे आणि 265 मशिदींना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. सरकारने जारी केलेल्या नियमावलीचे कुठल्याही परिस्थितीत पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या ध्वनी प्रदुषणच्या नियमांचे पालन करावे असे बजावण्यात आले आहे. आवाजाची मर्यादा ओलांडल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. तसेच, उत्तर प्रदेशात कोणत्याही धर्माचा जुलूस किंवा शोभायात्रा काढण्यासाठी सुरुवातीला प्रतिज्ञा पत्र सादर करावे लागले. सध्या भोंग्यांवरुन उत्तर प्रदेशातही वातावरण पेटले आहे. म्हणूनच यासंदर्भात योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
( हेही वाचा 1 मे पासून केस कापणे ही महागणार; जाणून घ्या नवे दर )
नियमावली
- माइक, साऊंड सिस्टमचा वापर केला जावा, परंतु याचा आवाज धार्मिक परिसराच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी.
- आवाजाचा कुठलाही त्रास अन्य लोकांना होता कामा नये.
- नवीन स्थळांवर लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी घ्यावी.
- कुठल्याही परवानगीशिवाय शोभायात्रा किंवा जुलूस काढू नये, परवानगी देण्यापूर्वी शांतता आणि सलोखा राखला जाईल यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल.
- जे पारंपारिक सण, उत्सव आहेत किंवा धार्मिक यात्रा आहेत तेव्हाच परवानगी दिली जाईल. अनावश्यक कारणासाठी परवानगी दिली जाणार नाही.