विहिरीत पडला गवा अन्…

112

साता-यातील पाटण तालुक्यात सोमवारी रात्री एका विहिरीत रानगवा पडला. या गव्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभागाने संपूर्ण विहिरीच तोडली. विहिरीत पाणी नसल्याने गव्याला कोणताही धोका पोहोचला नाही. रात्रभर विहिरीतील गाळातच हा गवा पडून राहिला होता.

( हेही वाचा : बेस्टच्या सामायिक कार्डकडे प्रवाशांनी फिरवली पाठ )

दीड तासांच्या प्रयत्नानंतर अखेर गवा विहीरीबाहेर

पाटण तालुक्यातील मारुल येथे लक्ष्मण चौधरी यांच्या शेतात गवा पडल्याची घटना घडली. विहीर वापरातील नसल्याने विहिरीत गवा पडल्याचे दुपारच्यावेळी ध्यानात आले. लक्ष्मण चौधरी यांनी तातडीने वनाधिका-यांना या घटनेची कल्पना दिली. वनाधिका-यांनी घटनास्थळी भेट देत अगोदरच परिस्थितीची पाहणी केली. विहिरीत अंदाजे अडीच फूटांचा गाळ होता. गवा त्यातच अडकून पडला होता. विहीर अंदाजे १५ फूट उंचीच असल्याने विहिरीला तोडून गव्याला बाहेर जाण्यासाठी मार्ग मोकळा करुन देण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. त्यानुसार, जेसीबीच्या साहाय्याने विहीर खणली गेली. दीड तासांच्या प्रयत्नानंतर अखेर गवा विहीरीबाहेर आला. मात्र बाहेर पडताच त्याने धूम ठोकली.

गवा रात्रीच्या अंधारात विहिरीत पडला असावा. या भागांत गव्यांची संख्या चांगली आहे. गवे झुंडीने एकत्र राहतात. मात्र रात्रीच्या काळोखात या गव्याला विहिरीची कल्पना आली नाही. विहीरीत पाणी नसल्याने सुदैवाने कोणती दुर्घटना घडली नाही.
– एल. व्ही. पोतदार, वनपरिक्षेत्रअधिकारी, पाटण, सातारा वनविभाग (प्रादेशिक)

वनविभागाचे बचाव पथक 

सातारा वनविभाग (प्रादेशिक)चे उपवनसंरक्षक एन.एम.मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा सामाजिक वनीकरण व कॅम्पचे सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, सातारा वनीकरण विभागाचे वनसंरक्षक सुधीर सोनावले, पाटण तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल. व्ही. पोतदार, वनपाल वाय.एस.सावर्डेकर, वनपाल संतोष यादव, वनमजूर संजय जाधव, वनमजूर यशवंत बनसोडे यांनी ही कारवाई पार पडली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.