आता मुंबईतली BEST लवकरच होणार १०० टक्के इलेक्ट्रिक!

378

मुंबईतील बेस्ट प्रवासादरम्यान अनेकदा सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहक यांच्यात वाद होत होते. या होणार्‍या वादांवर तोडगा म्हणून बेस्ट उपक्रमाने ‘टॅप इन – टॅप आऊट’ सुविधेची १०० टक्के ‘डिजिटल बस’ सेवेत आणण्याची पूर्वतयारी केली आहे. या सुविधेची ‘डिजिटल बस’ मिळवणारे मुंबई शहर देशातील पहिले असल्याचे सांगितले जात असून या बसेसच्या प्रवेशद्वारावर ’डिजिटल बस’, असा उल्लेख देखील केलेला असणार आहे. या सुविधेचा लोकार्पण सोहळा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे बुधवार करण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुंबईतली बेस्ट बस आता लवकरच १०० टक्के इलेक्ट्रिक होणार असल्याची घोषणा केली आहे.

ऑगस्टपर्यंत ९०० इलेक्ट्रिक डबल डेकर धावणार

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते डिजिटल कार्डचे अनावरणही करण्यात आले असून हे कार्ड रिचार्ज करता येऊ शकते. तसेच केवळ शंभर रुपयांत हे कार्ड प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. दरम्यान, येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ९०० इलेक्ट्रिक डबल डेकर बस रस्त्यावर धावताना दिसणार आहे. सध्या ३ हजार ३३७ बस उपलब्ध आहेत. १० हजार बसची गरज आहे. या बस १०० टक्के पर्यावरण पूरक असाव्यात, त्यातल्या सगळ्या इलेक्ट्रिक हव्यात. या सर्व बसपैकी निम्म्या बस डबल डेकर असतील अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली आहे.

(हेही वाचा – मुंबई टू कोल्हापूर व्हाया सातारा! सदावर्तेंच्या मागे पोलीस चौकशीचा ससेमिरा )

आदित्य ठाकरे म्हणाले, बेस्ट खरंच बेस्ट आहे

बेस्टमध्ये चढले की सतत पुढे चला असे म्हटले जाते. असेच आपणही आता पुढे जात आहोत, पुढे जात राहणार. पुढे चला हाच आपला मंत्र राहिलेला आहे. बेस्टला पुढे कसे नेता येईल यावर सतत बोलणे सुरू असते. कारण बॉम्बहल्ले, पूर, कोविड काळ या सगळ्यात बेस्ट कायम धावत राहिली आहे. बेस्ट खरंच बेस्ट आहे. बेस्टचा प्रवास इलेक्ट्रिकपासून सुरू झाला आता आपण पुन्हा इलेक्ट्रिककडे आलो आहोत. डबलडेकर बस हव्यात असा माझा आणि मुख्यमंत्री महोदयांचा कायमच आग्रह राहिलेला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.