मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा आजार नियंत्रण असतानाच आता अचानक दोन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येऊ लागली आहे. आजवर चाळीशीच्या आसपास असणाऱ्या या रुग्णांच्या संख्येने आता शंभरीच्या जवळपास मजल मारली आहे. त्यामुळे या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या भोंग्याचा आवाज वाढू लागल्याने पुन्हा एकदा चिंतेने मुंबईकरांचे कानावर हात पडू लागले आहेत.
( हेही वाचा : सांस्कृतिक शहरातील धक्कादायक प्रकार! फी न भरल्यानेत मुलाला केली ही शिक्षा )
महापालिका प्रशासनाचा दावा
मुंबईत मंगळवारी जिथे ८५ रुग्ण आढळून आले होते, तिथे बुधवारी ९८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी ९३७२ चाचण्या केल्यानंतर ८५ रुग्ण आढळून आले होते, तर बुधवारी ९५१४ चाचण्या करण्यात आल्यानंतर ९८ नवीन रुग्ण आढळून आले. या ९८ पैंकी ९६ रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नसून सध्या १० रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहे. तर दिवसभरात कोविड आजाराने ७३ रुग्ण बरे झाले आहेत. तर मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के एवढे असून रुग्ण दुपटीचा दर हा १२ हजार९५३ दिवसांवर आलेला असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
- २० एप्रिल २०२२ : एकूण रुग्ण :९८, मृत : ००
- १९ एप्रिल २०२२: एकूण रुग्ण :८५, मृत :००
- १८ एप्रिल २०२२ : एकूण रुग्ण :३४ ,मृत : ००
- १७ एप्रिल २०२२ : एकूण रुग्ण ५५, मृत :००
- १६ एप्रिल २०२२ : एकूण रुग्ण ४३, मृत:००
- १५ एप्रिल २०२२: एकूण रुगण ४४, मृत:०१
- १४ एप्रिल २०२२ : एकूण रुग्ण ५६, मृत ०१