मुंबईत पावसाळ्यात झाडांच्या फांद्या पडून किंवा झाडे उन्मळून पडण्याच्या दुघर्टना घडत असल्याने मुंबई महापालिकेच्यावतीने मान्सूनपूर्व झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येते. मागील वर्षी पावसाळ्यात झाडे पडून झालेल्या दुघर्टनेत महापालिकेच्या अखत्यारितील झाडांच्या तुलनेत खासगी सोसायट्या तसेच सरकारी कार्यालयाच्या हद्दीतील झाडांचाच अधिक समावेश असल्याने यंदा महापालिकेने विशेष काळजी घेतली आहे. त्यामुळे महापालिकेने यंदा तब्बल ५२६२ सोसायट्यांसह सरकारी वसाहतींना नोटीस जारी करत आपल्या हद्दीतील झाडांच्या धोकादायक फांद्या छाटून टाकाव्यात अशाप्रकारच्या सूचना केल्या आहेत.
( हेही वाचा : सदावर्तेंवरील पोलीस कारवाईमुळे जे. जे. मधील १२२ कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या )
महापालिकेने बजावली नोटीस
मुंबईत मान्सूनपूर्वी झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येते तसेच मृत झाडे कापण्यात येतात. मुंबई महापालिकेच्यावतीने २४ विभागांमध्ये यासाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदारांकडून रस्त्याकडेला असलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येते. परंतु खासगी गृहनिर्माण सोसायट्यांसह इतर सरकारी वसाहतींमधील तसेच त्यांच्या हद्दीमधील झाडांच्या फांद्यांची छाटणी महापालिकेच्यावतीने केली जात नसल्याने पावसाळ्यात अशाप्रकारे धोकादायक फांद्या मुसळधार पावसात पडून दुघर्टना संभवते. मागील तीन पावसाळ्यात तब्बल १८ हजार झाडांच्या फांद्या तुटून पडणे किंवा झाडे उन्मळून पडण्याच्या घटना खासगी गृहनिर्माण सोसायट्यांच्या हद्दीत घडल्या आहेत.
त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाने सुरक्षेच्या उपाय म्हणून मागील जानेवारी महिन्यात केलेल्या सर्वेनुसार आतापर्यंत ५२६२ सोसायटी आणि सरकारी वसाहतींना याबाबत नोटीस बजावली आहे. उद्यान विभागाचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी याबाबत बोलतांना, खासगी सोसायट्यांच्या हद्दीतील झाडांच्या फांद्यांची छाटणी महापालिकेच्यावतीने केली जात नाही. त्यामुळे त्यांना यंदाही नोटीस बजावून धोकादायक फांद्यांची छाटणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये संबंधित सोसायट्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना महापालिकेच्यावतीने परवानगी दिली जाईल आणि त्यांनी स्वत: ती छाटणी करावी किंवा त्यांनी याबाबतचे शुल्क महापालिकेला भरल्यानंतर महापालिकेच्या नियुक्त केलेल्या कंत्राटदारामार्फत त्या फांद्यांची छाटणी केली जाईल. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक सोसायट्यांनी आपल्या आवारातील झाडांच्या पसरलेल्या फांद्यांना आकार द्यावा आणि त्या फांद्या धोकादायक नाही ना याची खात्री करून त्यांची छाटणी करावी,असेही आवाहन त्यांनी केले आहे.
भाजपची मागणी
विशेष म्हणजे खासगी सोसायट्यांच्या हद्दीतील झाडांच्या फांद्यांची छाटणी महापालिकेच्या निधीतून करण्यात यावी आणि महापालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांकडून ते काम करून घेण्यात यावे अशाप्रकारची मागणी भाजप नगरसेवकांच्यावतीने वारंवार केली जात आहे. तसेच तोक्ते वादळामध्ये खासगी इमारतींच्या आवारातील पडलेली झाडे महापालिकेने उचलण्याची मागणीर केली होती, परंतु महापालिकेने खासगी इमारतीच्या आवारातील झाडेही उचलली नव्हती.
- एकूण नोटीस : ५२६२
- सर्वांधिक नोटीस असलेला वॉर्ड :
- के पश्चिम(विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम) :२१५०
- पी दक्षिण (गोरेगाव) :६५५
- डि (मलबारहिल,ग्रँटरोड) ३१२
- पी उत्तर (मालाड) : २८०
- एन विभाग (घाटकोपर) :२०४
- जी उत्तर (दादर,माहिम) : १४९