राज्यात इतकेच कोरोना बळी, तरी सरकारकडून मिळतेय जास्त जणांना भरपाई! काय आहे कारण?

138

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 50 हजार रुपयांची भरपाई देण्यात येत आहे. यासाठी सरकारकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. पण राज्यातील कोरोना मृतांची नोंद असलेल्या संख्येपेक्षा दुप्पट अर्ज भरपाईसाठी आले असून, मृतांच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा जास्त जणांना भरपाई देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रुग्णांच्या नातेवाईकांना भरपाई देण्यात येत असल्याने हा आकडा वाढल्याचे राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाचे म्हणणे आहे.

मृतांपेक्षा भरपाईचे लाभार्थी जास्त

मृत्यू झालेल्या कोविडबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 50 हजार रुपयांची भरपाई देण्यात येत आहे. या भरपाईचे अर्ज भरण्यासाठी राज्य सरकारकडून डिसेंबर 2021 मध्ये एक वेबसाईट सुरू करण्यात आली असून, एकूण 70 टक्के कुटुंबीयांना भरपाई देण्यात आली आहे. पण राज्यातील कोविड मृतांचा अधिकृत आकडा बुधवार 20 एप्रिल पर्यंत 1 लाख 47 हजार 830 इतका नोंदवला गेला असून, भरपाईसाठी मात्र 2 लाख 52 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. इतकंच नाही तर आतापर्यंत भरपाई देण्यात आलेल्या कुटुंबीयांची संख्या देखील 1 लाख 74 हजारांच्या वर असल्याचे मदत व पुनर्वसन विभागाकडून सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः रिक्षा, टॅक्सीचे भाडे वाढणार? असे असतील नवीन दर)

काय आहे कारण?

सर्वोच्च न्यायालाने दिलेल्या आदेशानुसार कोरोना मृतांच्या नातेवाईकांना भरपाई देण्यात येत आहे. त्यामुळेच ही तफावत दिसून येत असल्याचे सांगण्यात येत आहे. आयसीएमआरने दिलेल्या नियमावलीनुसार राज्यातील कोरोना मृतांची नोंद केली जाते. यामध्ये केवळ कोरोना चाचणीमध्ये बाधित झालेल्या रुग्णाच्याच मृत्यूची नोंद होते. पण सर्वोच्च न्यायालयाने कोविड मृतांच्या नोंदीची व्याप्ती वाढवल्यामुळे हे आकडे वाढणे अपेक्षित होते. तसेच काही कुटुंबीयांनी एकापेक्षा जास्त वेळा अर्ज भरल्यामुळे देखील या संख्येत 30 टक्क्यांपर्यंत तफावत आढळत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण कमी असल्याचे आरोग्य विभागाचे अपर सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे निकष

सर्वोच्च न्यायालयाकडून कोरोना मृतांच्या संज्ञेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. कोविडबाधित असल्याचा अहवाल असल्यास किंवा रुग्णालयात रुग्ण दाखल असताना त्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यास अशा रुग्णाचीही कोरोना मृत्यू म्हणून नोंद करावी. तसेच कोरोनाबाधित रुग्णाचा बाधित झाल्यापासून 30 दिवसांनी मृत्यू झाल्यास, एखाद्या रुग्णाचा रुग्णालयाबाहेर किंवा कोरोनाचे निदान झाल्याने आत्महत्या केलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या मृतांच्या मृत्यूप्रमाण पत्रावर कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद नसली तरी अर्जाची पडताळणी करुन भरपाई देण्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.

(हेही वाचाः महाराजांची भूमिका साकारणा-या चिन्मयनं आपल्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ का ठेवलं? वाचा उत्तर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.