जिलेटिन कांड्यांचा वापर करुन पिंपरी- चिंचवडमध्ये एटीएम फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. पहाटे तीनच्या सुमारास चिखली परिसरातील कॅनरा बॅंकेचे एटीएम कांड्या लावून उडवण्यात आले आहे. जिलेटीन काड्यांच्या स्फोटामुळे लाखो रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्या आहेत. पण इतकं करुनही चोरट्यांना मात्र रोकड लुटता आलेली नाही. चोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला आहे. सध्या पोलिसांकडून या चोरट्यांचा शोध सुरु आहे.
घटनास्थळी पोलीस दाखल
चोरट्यांनी एटीएममधील कॅश लुटण्यासाठी केलेला हा स्फोट इतका मोठा होता की स्फोटात एटीएम मशीन उद्ध्वस्त झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवडच्या चिखली परिसरात असणारे कॅनरा बॅंकेचे एटीएम दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात दोघांनी ब्लास्ट घडवून फोडले आहे. घटनास्थळी चिखली पोलीस BDDS ची टीम दाखल झाली आहे.
( हेही वाचा: धनंजय मुंडे यांची महिलेविरुद्ध पोलिसांत 5 कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार! )
असा घडवून आणला स्फोट
एटीएम मशीन जवळ जिलेटीन कांड्या या चोरट्यांनी ठेवल्या आणि पंचवीस मीटर अंतरावर वायर टाकली आणि कशाच्या तरी साहाय्याने करंट पास करुन हा ब्लास्ट घडवण्यात आला. मात्र या ब्लास्टमुळे मशीनच्या वरील पत्रा केवळ बाजूला झाला. रोकडच्या वर असलेला जाड पत्रा मात्र तसाच राहिला आहे. त्यामुळे चोरट्यांचा रोकड लुटण्याचा डाव फसला आहे.
Join Our WhatsApp Community