राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरून वारंवार कॉल करून खंडणीसाठी धमकी देणाऱ्या महिलेला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने इंदोर येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेली महिला ही रेणू शर्मा ही असून तिनेच मुंडे यांना धमकी देऊन ५कोटी रुपयांची रोकड आणि दुकानाची मागणी केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. गुरुवारी तिला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले असता शनिवार २३ जानेवारीपर्यंत तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
( हेही वाचा : डेक्कन क्वीनमध्ये आता चॅटबाॅट सुविधा, असा करा मजेशीर प्रवास! )
रेणू शर्माला अटक
रेणू शर्मा ही मूळची मध्य प्रदेश राज्यातील इंदोर येथे राहणारी असून करुणा शर्मा हिची बहीण आहे. रेणू शर्मा हिने जानेवारी २०२१ रोजी ओशिवरा पोलीस ठाण्यात मुंडे यांच्याविरोधात अर्ज करून बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर रेणू शर्माने या अर्जाच्या आधारावर सोशल मीडियावर मुंडे यांची बदनामी सुरू केली होती. दरम्यान ओशिवरा पोलिसांनी या अर्जाबाबत तपास केला असता असा कुठलाही गुन्हा झाला नसल्याचे तपासात निष्पन्न झाले होते, त्यानंतर रेणू शर्माने पोलीस ठाण्यात प्रतिज्ञापत्र सादर करून तक्रार अर्ज मागे घेतला होता. रेणू शर्माने वारंवार मुंडे यांना फोन करून तर कधी व्हॉट्सअॅप वर बदनामी करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केली असता मुंडे यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले मात्र तिचे फोन कॉल वाढल्यामुळे मुंडे यांनी एका माध्यस्थीच्या मदतीने तिच्या इंदोर येथील पत्त्यावर फेब्रुवारी २०२२ मध्ये तीन लाख रुपये आणि दीड लाख किमतीचा मोबाईल फोन पाठवला.
शनिवारपर्यंत पोलीस कोठडी
मात्र तिने त्यानंतर आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरून कॉल करून ५ कोटी रोकड, दुकान, मोबाईल फोनची मागणी केली, ही मागणी पूर्ण नाही केली तर ती पुन्हा बलात्काराची तक्रार करेल आणि ओशिवरा येथील तक्रार मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाब आणला होता अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकून बदनामी करेन अशी धमकी रेणू शर्माने धनंजय मुंडे यांना दिल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर हा गुन्हा मुंबई गुन्हे शाखेकडे तपासासाठी देण्यात आला होता. गुन्हे शाखा कक्ष २ च्या अधिकारी यांनी तात्काळ गुन्ह्याचा तपास करून गुरुवारी सकाळी इंदोर पोलिसांच्या मदतीने रेणू शर्माला तिच्या घरातून अटक केली. इंदोर न्यायालयातून रेणू शर्माला ट्रँझिस्ट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले असून तिला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने शनिवारपर्यंत तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.
Join Our WhatsApp Community