शिवराज अष्टक या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील आठ चित्रपटांच्या मालिकेतील चौथं पुष्प शेर शिवराज हे 22 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. यावेळी या सिनेमात महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या कथेविषयी आणि त्यातील आपल्या भूमिकेविषयी हिंदुस्थान पोस्टला माहिती दिली.
…तर ती जबाबदारी उचलायला हवी
द काश्मीर फाईल्स या चित्रपटात बिट्टा कराटे या दहशतवाद्याची भूमिका चिन्मय मांडलेकर यांनी साकारली आहे. त्यामुळे एकीकडे स्वराज्य घडवणारे महाराज आणि दुसरीकडे स्वराज्य बिघडवणारं एक पात्र साकारणं हे अभिनेता म्हणून आव्हानात्मक होतं. पण द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचं जे म्हणणं आहे ते खूप महत्वाचं आहे, जी गोष्ट गेली 32 वर्ष दडवून ठेवण्यात आली ती लोकांना सांगणं फार महत्वाचं आहे. हे करत असताना जर मी किंवा माझं पात्र वाईट ठरत असेल आणि त्यामुळे जर ती गोष्ट लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचत असेल तर आपण ती जबाबदारी उचलायला हवी असं मला वाटलं. त्यामुळे या दोन्ही भूमिका साकारताना माझ्या मनात कुठलाही संभ्रम नव्हता, असं चिन्मय मांडलेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
(हेही वाचाः महाराजांची भूमिका साकारणा-या चिन्मयनं आपल्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ का ठेवलं? वाचा उत्तर)
हे माझ्या प्रेक्षकांंचं यश
एकाच वेळी अशा दोन टोकाच्या भूमिका मला करायला मिळाल्या यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी मराठी आहे, मराठी मातीत जन्माला आलो हे माझं दुसरं मोठं भाग्य आहे. त्यामुळे माझा मराठी प्रेक्षकांच्या प्रगल्भतेवर विश्वास होता त्यामुळे या दोन्ही भूमिकांमध्ये मला प्रेक्षक स्वीकारतील याची खात्री होती आणि माझा हाच विश्वास प्रेक्षकांनी खरा ठरवला, त्यामुळे माझ्या या दोन्ही भूमिकांना मिळणारी दाद हे माझं नाही तर माझ्या प्रेक्षकांचं यश आहे, अशा शब्दांत चिन्मय मांडलेकर यांनी आपल्या प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
(हेही वाचाः ‘हा’ पाश्चिमात्य चित्रपट पाहून महाराजांवरील चित्रपट करायला चालना मिळाली- दिग्पाल लांजेकर)
Join Our WhatsApp Community