छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध करुन जो पराक्रम गाजवला त्या पराक्रमाची गाथा सांगणारा शेर शिवराज हा सिनेमा 22 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी हिंदुस्थान पोस्टशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज अष्टकाप्रमाणेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित तीन चित्रपट जागतिक स्तरावर करण्याचा मानस असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ‘त्रिदळ’
छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा माझे दैवत आहेत. त्यामुळे श्रीशिवराज अष्टकाप्रमाणेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचं त्रिदळ माझ्या मनात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडन, अंदमान आणि रत्नागिरी याठिकाणी केलेलं कार्य फार मोठं आहे. त्यामुळे त्यांचं हे कार्य तीन चित्रपटांच्या माध्यमातून समोर आणण्याची माझी इच्छा आहे. हे चित्रपट जागतिक पातळीवर नेण्यासाठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हे स्वप्न आम्ही सर्वांनी मिळून पाहिले असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
(हेही वाचाः दडवलेला इतिहास लोकांसमोर आला हे महत्वाचं, ‘द काश्मीर फाईल्स’च्या बिट्टा कराटेचं मत)
आराध्य दैवतांचं ‘अष्टक’
आपली जी आराध्य दैवतं आहेत त्यांच्याबद्दल आपल्या संतांनी अष्टकं लिहून ठेवली आहेत. त्यामधून त्या दैवताची स्तुती करण्यात आली आहे. त्याच स्वरुपाचं अष्टक आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारं हे श्रीशिवराज अष्टक आहे. आठ चित्रपटांच्या या मालिकेतून महाराजांच्या जीवनातील महत्वपूर्ण प्रसंग आणि घटना लोकांसमोर मांडण्याचा आम्ही ध्यास घेतला आहे, असंही दिग्पाल लांजेकर यांनी सांगितलं.
Join Our WhatsApp Community