अंधेरी पश्चिम येथील नवरंग सिनेमा जवळील तब्बल ३० हजार चौरस फुटांच्या बांधकामांवर महापालिकेने हातोडा चालवला. विशेष म्हणजे आजवर १८ वेळा या बांधकामांवर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली होती. परंतु मागील आठवड्यात हे संपूर्ण बांधकामच जमिनदोस्त करण्यात आले असून यामुळे एस.व्ही.रोडचा बॉटलनेक आता खुला झाला आहे. त्यामुळे या भागातील एस.व्ही. रोडचा रस्ता अरुंद झाल्याने मोठ्याप्रमाणात होणारी वाहतूक कोंडी समस्याही हे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आल्याने दूर झाली आहे.
( हेही वाचा : जगभरात चंद्रपूर सर्वात जास्त उष्ण शहर )
वाहतूक कोंडीची मोठी समस्या दूर
अंधेरी पश्चिम येथील तळ अधिक तीन मजल्याचे अनधिकृत बांधकाम मागील अनेक महिन्यांपासून उभे होते. याच्या तळ मजल्यावर दुकान, वरील भागात जिम आणि फर्निचरसह लग्नाचाही हॉल या जागेत होता. मात्र, हे बांधकाम अनधिकृत असल्याने संबंधित मालकाने न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाचा निकाल त्यांच्या विरोधात गेल्याने महापालिकेने मागील आठवड्यात ही कारवाई केली. तब्बल तीस हजार चौरस फुटांच्या या बांधकामांवर कारवाई करून संपूर्णच बांधकामच जमिनदोस्त करण्यात आले. हे बांधकाम एस.व्ही.रोडच्या रस्ता रुंदीकरणातही बाधित होत होते. त्यामुळे आता एस.व्ही. रोडवरील या भागाचेही रुंदीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाल्याने भविष्यात या भागात होणारी वाहतूक कोंडीची मोठी समस्या दूर झाली आहे.
महापालिकेच्या के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली इमारत व कारखाने विभागातील अभियंत्यांसह कर्मचारी व कामगार आदींनी ही कारवाई केली. हे बांधकाम तोडण्यात आल्याने एस.व्ही.रोडच्या रस्त्याचे आठ ते दहा फूट रुंदीकरण करता येणार आहे.
Join Our WhatsApp Community