ऐन आंब्याच्या हंगामात विजेचे अनियमित भारनियमन सुरू झाल्याने रत्नागिरीतील पावस विभागात बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांचे नुकसान करू नये, अशी मागणी रत्नागिरी जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना केली आहे.
( हेही वाचा : कोकण रेल्वे सुसाट! १ मे पासून ‘या’ गाड्या धावणार विद्युतवेगाने… )
अर्थकारणावर लोडशेडिंगचा विपरीत परिणाम
पावस विभागात अचानक भारनियमन सुरू झाल्याने परिसरातील आंबा, काजू, फणस इत्यादीचे उत्पादक तसेच हॉटेल व्यवसायिक व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. रत्नागिरी जिल्हा लोडशेडिंगपासून मुक्त असल्याचे घोषित झाले असताना पावस भागात वीजपुरवठा खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे आंबा, काजू, फणस उत्पादकांना प्रचंड फटका बसणार आहे. त्यामुळे या भागातील अर्थकारणावर या लोडशेडिंगचा विपरीत परिणाम होणार आहे. ऐन मोक्याच्या वेळी महावितरणने लोडशेडिंग करून पावस परिसरातील नागरिकांना अडचणीत आणले आहे.
लोडशेडिंगचे धोरण तात्काळ थांबवावे
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र तसेच पावस विभागात मोठ्या संख्येने पर्यटक आलेले असताना लोडशेडिंगमुळे खूप अडचणी निर्माण होत असून, याचा पर्यटनावर तसेच हॉटेल व्यवसायिकांवर विपरीत परिणाम होतो. या सर्वाचा विचार करून कोणतेही तांत्रिक कारण पुढे न करता वीजपुरवठा अखंड ठेवावा, अशी मागणी करणारे निवेदन दीपक पटवर्धन यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना सादर केले आहे. जनभावना लक्षात घेऊन लोडशेडिंगचे धोरण तात्काळ थांबवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community