कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यात लोडशेडिंग करण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी केली. त्यामुळे राज्यातील जनता लोडशेडिंगच्या संकटामुळे त्रस्त झाली आहे. पण यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत असून लवकरच यावर तोडगा काढण्यात येणार आहे. कोळशाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी छत्तीसगढ मधील कोळशाची खाण घेण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता
देशभरात कोळशाचं संकट निर्माण झाल्यामुळे राज्यात लोडशेडिंग सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे यावर उपाय काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. दर आठवड्याला ऊर्जा विभागाची एक आढावा बैठक घेण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. देशात ज्या ठिकाणी वीज उपलब्ध असेल ती राज्यात आणण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. छत्तीसगढ मधील एक कोळशाची खाणच राज्याच्या ऊर्जा विभागासाठी घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
(हेही वाचाः राज्यात लोड शेडिंगची घोषणा! कुठल्या भागात किती वेळ होणार ‘बत्ती गुल’?)
परदेशातून कोळसा आयात करणार
देश पातळीवर कोळशाचं संकट निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारने परदेशातून कोळसा आयात करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. त्यामुळे राज्यात लोडशेडिंग न करता सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी राज्य सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत असून, नागरिकांनी देखील वीजेचा अपव्यय टाळावा, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
कुठे होणार लोडशेडिंग?
ज्या भागांमध्ये वीज वितरण होऊन सुद्धा वीजेची थकबाकी आहे, तसेच जिथे विजेची चोरी मोठ्या प्रमाणावर होते अशा जी-1, जी-2, जी-3 भागांमध्ये लोडशेडिंग करण्याचे आदेश दिल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे. त्यामुळे ग्राहकांनी विजेची थकबाकी लवकरात लवकर भरावी आणि चो-या थांबवाव्यात असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
(हेही वाचाः …तर फडणवीस आज मुख्यमंत्री असते, संजय राऊतांचा गौप्यस्फोट)
Join Our WhatsApp Community