“मलिकांना मंत्रिपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान”

135

तुरुंगाच्या कोठडीतून मंत्रिपदाचा कारभार पाहणाऱ्या नवाब मलिक यांच्यावर पाच हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले गेले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. असे असताना त्यांना मंत्रिमंडळात ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत, अशी जोरदार टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश प्रवक्ते व माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोन्डे , पॅनेलिस्ट समीर गुरव यावेळी उपस्थित होते. आता तरी मुख्यमंत्र्यांनी मलिक यांची हकालपट्टी करून महाराष्ट्राचा अपमान थांबवावा, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले उपाध्ये?

बेनामी मालमत्तांच्या व्यवहारातून गोळा केलेला पैसा दाऊदच्या दहशतवादी कारवायांना पुरविण्याचा आरोप असलेल्या मलिक यांची तुरुंगात राहून सर्वाधिक काळ बिनखात्याचे मंत्री म्हणून नवा विक्रम केला आहे. खरे तर मलिक यांना अटक झाल्या झाल्या त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी होती. एरवी महाराष्ट्राच्या अस्मितेची भाषा वारंवार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध ठेवणाऱ्या मलिक यांची पाठराखण करताना महाराष्ट्राचा अपमान होतो आहे याची जाणीव नसावी हे दुर्दैवी आहे, असे उपाध्ये म्हणाले.

(हेही वाचा – राणेंना उच्च न्यायालयाकडून दिलासा; ‘या’ वक्तव्याप्रकरणी अटकेपासून संरक्षण)

खुर्ची जपण्यासाठी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा अपमान करताय

गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अस्मिता दुखावणाऱ्या कारवायांना सातत्याने प्रोत्साहनच दिले असून नवाब मलिक यांना तर त्यांनी चांगल्या कामाचे प्रशस्तीपत्रकही देऊन टाकले होते. शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणातील सचिन वाझे हा काही लादेन नाही, अशा शब्दांत त्याची प्रशंसाही केली होती. केंद्रीय मंत्री राणे यांच्या घरावर चाल करून जाणाऱ्यांच्या सत्कारास प्रोत्साहन देऊन मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनोवृत्तीचे दर्शन महाराष्ट्रास घडविले होते. सातत्याने आपली खुर्ची जपण्यासाठी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत, असेही उपाध्ये म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.