मोबाईल कंपनीकडून माॅडेल काॅलनी, पाषाण भागात बसविण्यात आलेले मनोरे तसेच साहित्याची चोरी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत देवेंद्र कुंभलकर यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेल्या वर्षी माॅडेल काॅलनी आणि पाषाण भागातील मोबाईल मनोरे चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कुंभलकर यांनी न्यायालयात तक्रार दिली होती. न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करुन चौकशीचे आदेश नुकतेच दिले.
२० लाख १९ हजार ७५९ रुपयांचा मुद्देमाल चोरला
कुंभलकर जीटीएल कंपनीत व्यवस्थापक आहेत. या कंपनीकडून मोबाईल कंपन्यांच्या मनोऱ्यांची देखभाल-दुरुस्तीचे काम पाहिले जाते. पाषाण येथील सर्वेक्षण क्रमांक १२१ आणि प्लाॅट क्रमांक २ येथे मोबाइल मनोऱ्यांची उभारणी करण्यात आली होती. या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते. मोबाईल मनोरा, बॅटरी तसेच अन्य उपकरणे असा २० लाख १९ हजार ७५९ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेण्यात आला. एप्रिल २०२१ मध्ये ही घटना घडली होती. माॅडेल काॅलनीतील कुसाळकर निवास येथील मोबाइल मनोरा, जनित्र, बॅटरी संच असा सहा लाख २८ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोबाइल मनोरे नेमके कसे चोरीला गेले, याबाबतची माहिती उपलब्ध झाली नाही. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
(हेही वाचा आम्हाला बघायचेच…शिवसैनिकांमध्ये दम आहे की हनुमानाच्या नामस्मरणात! नवनीत राणांचे आव्हान)
Join Our WhatsApp Community