रेल्वे उपनगरीय आणि मेल तथा एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सध्या प्रवाशांकडून अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर होत असून, मागील २० दिवसांमध्ये तब्बल १०८ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. मागील १ ते २० एप्रिल २०२२ या कालावधीत अलार्म चेन पुलींगच्या गैरवापराची १५७ प्रकरणे नोंदवली गेली. यापैकी सुमारे १०८ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.
प्रवाशांची गैरसोय
स्थानकात उशिरा पोहोचणे, मधल्या स्थानकांवर उतरणे तथा चढणे आदी शुल्लक कारणांसाठी अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर केला जातो. ट्रेनमधील अलार्म चेन पुलिंगच्या कृतीचा केवळ त्या विशिष्ट ट्रेनच्या वेळापत्रकावरच परिणाम होत नाही, तर त्या ट्रेनच्या मागून चालणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होतो. मुंबई विभागासारख्या उपनगरीय प्रणालीमध्ये, यामुळे मेल तथा एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या उशिराने चालतात आणि त्यांच्या वक्तशीरपणाला बाधा येते. तसेच एखाद्या किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर केल्याने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते.
(हेही वाचाः रस्त्यांची कामे सुरू आहेत का? बंद रस्त्यांची माहिती मिळवा गुगलवर)
इतक्या दंडाची वसुली
अशा अलार्म चेन पुलींग घटनांवर मध्य रेल्वेचा मुंबई विभाग बारीक लक्ष ठेवून आहे. यात १ एप्रिल २०२२ ते २० एप्रिल२०२२ या कालावधीत अलार्म चेन पुलींगच्या गैरवापराची १५७ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी सुमारे १०८ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ४७ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाचे आवाहन
अनावश्यक परिस्थितीत अलार्म चेन पुलींग करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा आहे. प्रवाशांनी त्यांच्या संबंधित गाड्या सुटण्याच्या किमान ३० मिनिटे आधी टर्मिनस तथा स्टेशनवर पोहोचण्याचे आणि मर्यादित सामान घेऊन जाण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. प्रवाशांना बॅटरीवर चालणाऱ्या कारच्या सेवांचाही वापर करता येईल किंवा स्टेशन व्यवस्थापक कार्यालयात उपलब्ध व्हिलचेअरचा वापर करून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती इच्छित डब्यापर्यंत पोहोचू शकतात, जेणेकरून गाड्यांमध्ये चढणे सुरळीतपणे आणि वेळेत करता येईल. त्यामुळे अनावश्यक कारणांसाठी अलार्म चेन पुलिंगचा वापर टाळता येईल, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
(हेही वाचाः पेडणेकरांना अजूनही महापौर निवास सोडवेना!)
Join Our WhatsApp Community