मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ आणि ठाण्यातील हाय व्होल्टेज सभेनंतर त्यांच्या औरंगाबाद येथे होणा-या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 1 मे रोजी औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या या सभेला अनेक संघटनांकडून विरोध करण्यात आला आहे.
पण तरीही मनसे मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा घेण्यावर ठाम आहे. याच मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांची औरंगाबादमधील पहिली सभा झाली होती. पण राज ठाकरे यांनी सभा घेतली तरी बाळासाहेबांच्या सभेचा रेकॉर्ड कोणीही तोडू शकत नाही, असं आव्हान शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज ठाकरे यांना दिलं आहे.
(हेही वाचाः ‘राज तिलक की करो तैयारी…’, बॅनरबाजी करत मनसेने सेनेला डिवचलं!)
बाळासाहेबांचा रेकॉर्ड मोडता येणार नाही
राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्याबाबत पोलिस आणि संबंधित प्रशासन निर्णय घेतील. पण राज ठाकरेंच्या सभेला गर्दी कशी जमा होते, तेच आम्हाला पहायचं आहे. राज ठाकरे यांनी सभा घेतली तरी त्यांना शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेचा रेकॉर्ड कुणालाही मोडता येणं शक्य नसल्याचं खैरे यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचाः राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेची खास निमंत्रण पत्रिका तयार; भगवे वस्त्र, हनुमान अन्…)
…तर दंगली होतील
राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा झाली तर दंगली घडून शकतात, असं मला सर्वसामान्य जनतेकडून सांगण्यात येत आहे. सभा कशासाठी हवी, राज ठाकरे यांनी भोंग्यांचा विषय काढला तर दंगली होतील. इथे मुस्लिमांची संख्या जास्त आहे, असं मला स्थानिकांकडून सांगण्यात येत असल्याचे खैरे यांनी म्हटले आहे.
सभेला परवानगी मिळणार?
1 मे रोजी मनसेची जाहीर सभा मराठवाडा सांस्कृतिक मैदानात घेण्यास पोलीस प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र, औरंगाबाद पोलिसांनी पर्यायी जागेचा प्रस्ताव मनसेसमोर ठेवल्याचे समोर आले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांची सभा गरवारे स्टेडियमवर घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मात्र मनसे ठरलेल्या ठिकाणीच सभा घेण्यावर ठाम आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी घोषणा केलेल्या सभेला परवानगी मिळते का, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
(हेही वाचाः औरंगाबादेतील राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांनी दिला ‘या’ पर्यायी जागेचा प्रस्ताव)
Join Our WhatsApp Community