…तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरले असते हिरो!

146
राणा दाम्प्त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर शिवसेनेने मातोश्रीवर जागता पहारा देण्यास सुरुवात केली आहे. राणा दाम्पत्य मुंबईत पोहोचणार नाही, अशी काळजी घेतल्यानंतरही मातोश्रीच्या अंगणापर्यंत जाऊन ते पोहोचले. त्यामुळे मातोश्रीच्या समोर आपण हनुमान चालिसाचे पठण करणार यावर राणा दाम्पत्य ठाम असून एका बाजुला राज्याचे पालक म्हणून कायदा व सुव्यवस्था राखण्याची प्रमुख जबाबदारी ही मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांची असताना त्यांच्याच पक्षाचे शिवसैनिक रस्त्यावर उतरले. शिवसैनिकांच्या कृतीमुळे उद्धव ठाकरे कमजोर बनले असून राणा दाम्पत्याला  मातोश्रीत सन्मानाने बोलावून त्यांना हनुमान चालिसा बोलण्यास परवानगी दिली असती, तर मुख्यमंत्री हिरो आणि राणा दाम्पत्य झिरो बनले असते. पण राजकारणाच्या सारीपटावरील ही खेळी शिवसेनेला खेळता आली नाही आणि दोन व्यक्तींसाठी आपली असली नसलेली पतही त्यांनी घालवून टाकली, अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.

राणा दाम्पत्य खार येथील आपल्या निवासस्थानी पोहोचले

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसाचे पठण न केल्यास उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीच्या समोर आपण याचे पठण करू असे आव्हान दिले. त्यानंतर त्यांनी अमरावतीतून बाहेर पडू नये म्हणून तेथील रेल्वे स्थानकावर स्थानिक शिवसेनेचे नेते तैनात झाले. पण त्यानंतरही ते मुंबईला रवाना होण्यासाठी गाडीत बसले. त्यामुळे त्यांना विरोध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक तैनात झाले होते. तरीही राणा दाम्पत्य खार येथील आपल्या निवासस्थानी पोहोचले. परंतु राणा दाम्पत्य मातोश्रीवर येणार असल्याने सकाळपासून या परिसरात शिवसेना नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत ही गर्दी होती. खुद्द पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीच्या ठिकाणी येऊन शिवसैनिकांचे मनोबल उंचावले. यावेळी त्यांनी तुम्ही सकाळपासून खूप थांबलात, आता घरी जा असे सांगत घरी जाण्याचे आवाहन केले.

शिवसेनेला भविष्यात धोकादायक ठरू शकते

मात्र, शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून राणा दाम्पत्य हनुमान चालिसाच पठण  करणार ना? नमाज तर नाही ना! ज्या मातोश्रीत बाळासाहेबांनी मुस्लिमाला नमाज करायची परवानगी दिली होती, तिथे हनुमान चालिसा बोलायला द्यायला काय हरकत आहे, अशी प्रतिक्रिया ऐकू येत होती.  शिवसैनिकांनी, राज्यात आपलेंच पक्षप्रमुख मुख्यमंत्री पदी असल्याने संयमाने घ्यायला हवे होते. खुद्द मुख्यमंत्र्यांनी, कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करता राणा दाम्पत्यला मातोश्रीच्या बाळासाहेबांच्या आसनाजवळ हनुमान चालिसा बोलण्याची व्यवस्था करून दिली असती, तर मुख्यमंत्र्यांच्या या खेळीने त्यांना राणा दाम्पत्याच्या राजकीय खेळीवर मात करता आली असती. परंतु शिवसैनिकांनी त्यांचे आव्हान स्वीकारून एक प्रकारे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री यांच्यासह शिवसेनेला कमजोर करत त्यांच्यापुढील अडचणी ठेवल्या अशाही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यामुळे जर कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याचा फटका मुख्यमंत्र्यांना बसू शकतो. राणा दाम्पत्याने अध्यात्मिक मार्गाचा अवलंब केला असून त्यांना रोखून एकप्रकारे शिवसेनेने आपले हिंदुत्व गहाण ठेवले की काय असाही संदेश जनमानसात पसरला आहे. ज्या बाळासाहेबांनी ज्वलंत हिंदुत्वाचा नारा दिला होता, त्याच त्यांच्या निवासस्थानी हनुमान चालिसा बोलायला रोखले जाते हा संदेश शिवसेनेला भविष्यात धोकादायक ठरू शकते असेही राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.