गेल्या काही दिवसांपासून राज्यात हनुमान चालिसा आणि भोंग्यांच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मातोश्री समोर हनुमान चालिसा पठणावर ठाम असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी ९ वाजता राणा दाम्पत्य मुंबईतील वांद्रे येथील मातोश्री समोर येणार असल्याचे सांगितले होते. यामुळे मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले आहेत. अशातच राणा दाम्प्त्यांना घराबाहेर येण्याचे आवाहन शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे. मात्र, अद्याप राणा दाम्पत्य घराच्या बाहेर पडले नाही. पण त्यांनी आज मातोश्रीवर जाणारच असल्याचे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओ करून सांगितले आहे.
काय म्हणाल्या नवनीत राणा?
दरम्यान, कायदा सुव्यवस्था नियंत्रणात राहण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी राणांच्या घरात दाखल झाले आहेत. माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार, राणा दाम्पत्यांनी खारमधील घरात हनुमानाला नमस्कार करून मातोश्रीवर जाणार असल्याचे सांगितले आहे. आम्ही या घरातून बाहेर पडणार असून आम्हाला काही झाल्यास त्याची जबाबदारी संपूर्ण मुख्यमंत्र्यांवर असणार आहे. शिवसैनिकांकडून गुंडगिरी सुरु आहे. आमच्या घरावर हल्ला होतोय, तरी आम्ही मातोश्रीवर जाणाराच.. हनुमान चालीसा म्हणण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही. महाराष्ट्र कुठे चालला आहे. महाराष्ट्राच्या सुख शांततेसाठी आम्ही जात आहोत. आम्हाला कोणी रोखू नये असे आवाहन रवी राणा यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केले.
…त्यांना का रोखले जात नाही
हनुमान, रामाचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राच्या शांतीसाठी राज्याला लागलेला शनी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शनिवार हा मारूतीचा दिवस असून याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात उन्नती झाली पाहिजे, शांती नांदली पाहिजे हा आमचा हेतू आहे. पण त्याला विरोध होतोय. अडवण्याचा प्रयत्न केला जात असून मुख्यमंत्री सत्तेचा दुरपयोग करत आहेत. हे बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक असूच शकत नाहीत. पोलिसांचा धाक आम्हाला दाखवत आम्हाला घरात बंद करून ठेवले आहे. आमच्या समोर कित्येक शिवसैनिक जमले असून त्यांना काहीच बोलले जात नाही. त्यांना का रोखले जात नाही, असा सवाल खासदार नवनीत राणांनी केला आहे.
“मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करताय”
राज्यातील पोलीस कोणाच्या दबावा खाली काम करत आहेत. पोलीस प्रशासनाचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याता आरोप देखील त्यांनी यावेळी लगावला. हनुमान चालिसा पठण करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एवढा विरोध का होतोय असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. शिवसैनिक गुंडगर्दी करत आहेत. आम्ही शांततेच्या मार्गाने मातोश्रीवर जात आहे. मी त्याठिकाणी महाराष्ट्राच्या शांततेसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी जात आहे. बाळासाहेब ठाकरे हे आमच्या हृदयात आहेत. मात्र सध्या मुख्यमंत्री मात्र, कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असल्याचे आरोप राणा यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community