राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी आलेल्या प्रथमा, सावनी, वनश्री आणि रेवा या चार मादी ऑलिव्ह रिडले कासवांनी गेल्या आठवड्याभरापासून मोठी भ्रमंती केलेली नाही. या कासवांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात वेळास आणि गुहागर येथून सॅटलाईट टॅगिंग करुन समुद्रात सोडले होते. सध्या चारही कासव ज्या भागांत आहेत त्या भागांत पुरेसे खाद्य उपलब्ध असल्याने फारशी हालचाल होत नसल्याची माहिती भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ आर. सुरेशकुमार यांनी दिली.
प्रथमा
महिन्याभरापूर्वी प्रथमा ही पहिली सॅटलाईट टॅगिंग केलेली मादी ऑलिव्ह रिडले गुजरातच्या समुद्रकिना-यात पोहोचली. गुजरातच्या समुद्रात ती पूर्वेकडे सरकत असताना गेल्या आठवड्यात पुन्हा पश्चिमेकडे सरकली होती. आता पुन्हा पूर्व भागांत परतली आहे. प्रथमा खंबातच्या आखातापासून दूर आहे, अशी माहिती सुरेशकुमार यांनी दिली.
सावनी
नवी मुंबईला भेट देऊन पुन्हा दक्षिणकडे परतलेली सावनीलाही काही आंजर्ले किना-यापासून फारसे दूर जाता येत नाही आहे. ती केवळ १०० किलोमीटर आत समुद्रातच भ्रमंती करत आहे.
वनश्री
वनश्री मालवण किना-यालगत आहे. मालवण किना-यापासून ती केवळ १० किलोमीटर समुद्रात भ्रमंती करत आहे.
रेवा
दोन आठवड्यांपूर्वी कर्नाटक राज्यात प्रवेश केलेल्या रेवाने कर्नाटक राज्यालाच आतापर्यंत पसंती दिली आहे. या अगोदर ती मंगळुरुनजीकच्या समुद्रकिना-यात दिसली होती. आता ती ६० किलोमीटर आत गेली आहे.
सॅटलाईट संपर्क तुटलेल्या लक्ष्मीची अजून आठवडाभर प्रतीक्षा
दोन महिन्यापूर्वी लक्ष्मी या मादी ऑलिव्ह रिडले कासवाचा सॅटलाईट टॅगिंगशी संपर्क तुटला होता. बॅटरीच्या अकार्यक्षमतेमुळे किंवा तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु तिचा संपर्क पुन्हा मिळवण्यात आम्ही अयशस्वी झाल्याची कबुली शास्त्रज्ञ सुरेशकुमार यांनी दिली. तिचा पुन्हा संपर्क होणे कठीण आहे. हा प्रकार ओरिसा येथील ऑलिव्ह रिडले सॅटलाईट टॅगिंगच्यावेळीही अनुभवायला मिळाला. परंतु संपर्क तुटणे हे फारच निराशाजनक आहे, असे भारतीय वन्यजीव संस्थेचे सॅटलाईट टॅगिंग ऑलिव्ह रिडले प्रकल्प आणि शास्त्रज्ञ, प्रकल्प संचालक डॉ. आर. सुरेशकुमार यांनी सांगितले.