राणा दाम्पत्यांनी मातोश्रीसमोर जाऊन हनुमान चालिसा वाचण्याचे आव्हान केल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी मुंबई दौ-यावर येत असल्याने त्याला गालबोट लागू नये म्हणून राणा दाम्पत्याने मातोश्रीवर जाण्यापासून माघार घेतली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी मुंबई दौ-यावर येत आहेत. त्यामुळे मोदींच्या दौ-याला कुठेही गालबोट लागू नये म्हणून आम्ही मातोश्रीवर जाण्यापासून माघार घेत असल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले आहे. एक आमदार आणि खासदार महाराष्ट्राची संस्कृती जपणं हे आमचं कर्तव्य आहे, असं राणा दाम्पत्यानं म्हटलं आहे.
(हेही वाचाः राज्यात सरकारच्या भरवशावर हल्ले होत आहेत- फडणवीस)
हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य
मातोश्री आमच्या मनात आहे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या मनात आहेत. मी कुठेही चुकीचं भाष्य केलं नाही. पण मातोश्रीवर हनुमान चालिसा न वाचता आम्हा दाम्पत्याला शिवसैनिकांकडून विरोध करण्यात आला. शनिवारी सकाळी आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार होतो, पण सकाळी आम्हाला पोलिसांकडून डांबून ठेवण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन काही शिवसैनिकांनी आमच्यावर आणि आमच्या घरावर हल्ला केला. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्रीच जर राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राची वाटचाल ही पश्चिम बंगालकडे होत असल्याची टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे.
आम्ही घाबरत नाही
राणा दाम्पत्याने घाबरुन माघार घेतल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात येत आहे. त्याला आता राणा दाम्पत्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आम्ही कोणाच्याही दबावामुळे माघार घेतलेली नाही. आम्ही कोणालाही घाबरत नाही, जर तसं असतं तर आम्ही अमरावतीहून मुंबईत आलोच नसतो. केवळ महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी आम्ही मातोश्रीवर जात नसल्याचे खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचाः राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यावरुन गृहमंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले…)
Join Our WhatsApp Community