भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांना मारण्याचा शिवसैनिकाचा कट पोलिसांनी उधळून लावत कंबोज यांना तेथून सुरक्षित रवाना करण्यात पोलिसांना यश आले. मोहित कंबोज यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
राणा दाम्पत्यांना रोखण्यासाठी मातोश्रीवर शुक्रवारी सकाळपासून शेकडो शिवसैनिक मातोश्रीच्या आवारात गोळा झाले होते. कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मातोश्री, कलानगर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीला भेट देत मातोश्री जवळ जमा झालेल्या शिवसैनिकांच्या भेट घेत तेथून वर्षावर रवाना झाले होते. मुख्यमंत्री स्वतः येऊन गेल्यामुळे शिवसैनिकाचे बळ वाढले होते.
मोहित कंबोज यांना शिवसैनिकांचा मारण्याचा कट होता
रात्री ९ वाजण्याच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज इतर भाजपच्या नेत्यांसोबत एका कार्यक्रमातून परतले होते व ते कलानगर सिग्नलजवळ इतर नेत्यांचे सोडून स्वतःच्या वाहनात बसण्यासाठी मातोश्री पासून काही अंतरावर उभ्या असलेल्या मोटारीकडे जात असताना कंबोज हे मातोश्री जवळील एका कँटीन जवळ उभ्या असलेल्या शिवसैनिकाच्या नजरेस पडले. मोहित कंबोज यांच्यावर शिवसैनिकांचा अगोदर राग असल्यामुळे त्यात मोहित कंबोज हे मातोश्री जवळ रेकी करण्यासाठी आल्याचा शिवसैनिकांचा समज झाला आणि शिवसैनिक मोहित कंबोज यांच्या मोटारीजवळ धावत गेले. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकुंभे, साहाय्यक पोलीस आयुक्त आव्हाड आणि इतर पोलीस अधिकारी यांनी धाव घेत कंबोज यांच्या मोटारीजवळ जमलेल्या शिवसैनिकांना दूर करून मोहित कंबोज यांना त्यांच्या मोटारीत बसवून त्यांची मोटार तेथून सुखरूप रवाना केली. मोहित कंबोज यांना शिवसैनिकांचा मारण्याचा कट होता, मात्र पोलिसांनी वेळीच तो कट उधळून लावला आहे. मोहित कंबोज यांनी देखील याबाबत पोलिसांचे कौतुक केले असून पोलिसांमुळे आपण वाचलो असे त्यांनी एका व्हिडिओत म्हटले आहे. मोहित कंबोज यांनी झालेल्या घटनेप्रकरणी तक्रार अर्ज सांताक्रूझ पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
Join Our WhatsApp Community