राणा दाम्पत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठणाचा निर्णय मागे घेतला असला तरी अजून शिवसैनिकांनी आपला आक्रमक पवित्रा कमी केलेला नाही. राणा दाम्पत्याने माफी मागावी, अशी मागणी आता शिवसैनिकांकडून करण्यात येत असून त्यांच्या विरोधात आता खार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान खार पोलिस राणा दाम्पत्याला नेण्यासाठी आले असताना त्यांनी पोलिसांसोबत यायला नकार दिला. पण अखेर राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
(हेही वाचाः तुम्हाला हनुमान चालिसा नको, आम्हाला भोंगे नकोत)
पोलिसांसोबत जाण्यास नकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी मुंबई दौ-यावर येणार असल्याने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन आपला हनुमान चालिसा पठणाचा निर्णय मागे घेतला आहे. आता शिवसैनिकांनी जल्लोष करायला सुरुवात केली असून, त्यांनी राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मातोश्रीची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तसेच त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी खार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलिस राणा दाम्पत्याला घेऊन जाण्यासाठी आले असता त्यांनी अटक वॉरंट दिल्याशिवाय आपण पोलिस स्थानकात येणार नसल्याचे सांगितले. पण अखेर राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
(हेही वाचाः जर अजित पवार मुख्यमंत्री असते तर… काय म्हणाल्या नवनीत राणा?)
त्यांच्यावर गुन्हा का नाही?
पोलिस यंत्रणा ही ठाकरे सरकारच्या दबावाखाली येऊन काम करत आहे. आम्हाला जबरदस्ती पोलिस स्टेशनमध्ये नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. संजय राऊत यांनी आमच्याबाबत आक्षेपार्ह विधानं केली आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, शिवसैनिकांकडून आमच्या घरावर हल्ला करण्यात येत आहे. पण आम्हालाही कायदा माहीत आहे, जोपर्यंत आम्हाला वॉरंट मिळत नाही तोपर्यंत आपण पोलिस स्थानकात जाणार नसल्याचे सांगत राणा दाम्पत्याने पोलिस स्थानकात जाण्यास नकार दिला आहे.
(हेही वाचाः अखेर राणा दाम्पत्याची मातोश्रीवर जाण्यापासून माघार, काय आहे कारण?)
Join Our WhatsApp Community