गेले दोन दिवस राज्यात कायदा-सुव्यवस्थेची दुरावस्था झाल्याचे पहायला मिळत आहे. राणा दाम्पत्याविरुद्ध शिवसैनिकांनी घेतलेला आक्रमक पवित्रा, शुक्रवारी रात्री भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर झालेला हल्ला या घटना ताज्या असतानाच आता शिवसेनेवर वारंवार टीका करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्यावर देखील शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला आहे.
सोमय्यांच्या गाडीवर शनिवारी रात्री दगडफेक करण्यात आली असून, या हल्ल्यात सोमय्या जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा निषेध करत सोमय्या यांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. तसेच यावेळी त्यांनी पोलिस आयुक्तांना जाब विचारला आहे.
(हेही वाचाः महाराष्ट्रातील घटना व्यथित करणाऱ्या, फडणवीसांना असे का वाटते?)
सोमय्यांविरोधात घोषणाबाजी
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी सोमय्या हे खार पोलिस स्थानकात आले होते. त्यावेळी तिथे जमलेल्या शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. सोमय्या हे राणा दाम्पत्याच्या भेटीला आल्यामुळे त्यांना भाजपचा पाठिंबा असल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला.
सोमय्यांना दुखापत
सोमय्या हे राणा दाम्पत्यांची भेट घेऊन खार पोलिस स्थानकातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी जोरदार हल्ला चढवला. त्यांच्या गाडीवर दगड, बाटल्या, चप्पला फेकण्यात आल्या. या हल्ल्यात सोमय्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या व त्यांच्या चेह-याला दुखापत झाली. सोमय्या यांच्या हनुवटीला मार लागला असून त्यातून रक्तस्त्राव होत होता. दरम्यान यानंतर सोमय्या यांनी वांद्रे पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
(हेही वाचाः उद्धव ठाकरेंना वाघ आवडतो की बकरी? नारायण राणेंचा सवाल)
संजय पांडे हे उद्धव ठाकरेंचे नोकर आहेत का?
पोलिस स्थानकाच्या आवारात शिवसेना गुंड घुसलेच कसे, पोलिस स्थानकाच्या आवारात त्यांनी मारहाण केली. त्यामुळे पोलिस स्थानकात गुंडगिरी करणा-या 70 शिवसैनिकांवर मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी कारवाई करावी, तसेच अशाप्रकारे हलगर्जी करणा-या संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या सोमय्या यांनी केल्या आहेत. संजय पांडे हे काय उद्धव ठाकरेंचे नोकर आहेत का, असा सवाल करत त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.
Join Our WhatsApp Community