जंगलात राहून वाघाशी आणि क्रिकेटच्या मैदानात राहून सचिनशी पंगा घेतल्यावर काय होतं, याचा प्रत्यय आजवर अनेकांना आला आहे.केवळ कुस्तीच्याच नाही तर क्रिकेटच्या मैदानात सुद्धा प्रतिस्पर्ध्यांना आसमान दाखवता येतं हे सचिनने केलेल्या अद्भुत खेळींतून लक्षात येतं.
सचिनला अनेकदा स्लेजिंग करत डिवचण्यात आलं, पण सचिनने त्यांना आपल्या तोंडाने नाही तर बॅटने उत्तर दिलं. भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच हे दोन्ही देशांसाठी तिसरं महायुद्धच. आणि युद्ध म्हटलं की त्यात आव्हान देणं, हल्ला चढवणं या गोष्टी होतच असतात. पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंनी आजवर सचिनला चिथावण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानचा असा एक खेळाडू आहे ज्याला सचिनने आपल्या पदार्पणातच शिकवलेला धडा हा क्रिकेटच्या इतिहासात नोंदवला गेला आहे. त्या खेळाडूचं नाव आहे, अब्दुल कादिर.
16 डिसेंबर 1989, पेशावर वन-डे
लेग स्पिनर कादिर हा त्यावेळी पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक. भल्या-भल्या खेळाडूंच्या कादिरच्या गोलंदाजीवर काठ्या उडायच्या. 1989 च्या पाकिस्तान दौ-यात सचिनने वयाच्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी सचिनला केवळ टेस्ट मॅचमध्येच खेळवण्यात येणार होते, वन-डे मध्ये सचिनला खेळवण्याचा संघाचा विचार नव्हता. पण पहिल्या वन-डे च्या आधी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे ती मॅच रद्द करण्यात आली. पण या मॅचसाठी प्रेक्षकांनी केलेली गर्दी पाहून एक अनौपचारिक(फ्रेंडली) मॅच खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी कपिल देवला मानेची दुखापत झाली होती. त्यामुळे ती आंतरराष्ट्रीय मॅच नसल्यामुळे सचिनला त्या वन-डे मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली.
मिळालेल्या या संधीचं सचिननं सोनं करत पाकिस्तानी खेळाडूंचा चांगलाच समाचार घेतला. त्याने आधी पाकिस्तानचा फिरकीपटू मुश्ताक अहमदला एका ओव्हरमध्ये 2 षटकार ठोकले. पण अब्दुल कादिर हा अनुभवी खेळाडू होता, त्याने त्याच मॅचमध्ये भारताचा कर्णधार श्रीकांतला मेडन ओव्हर टाकली होती. सचिनला चेंडू टाकायच्या आधी तो सचिनकडे गेला आणि त्याने,
मुझे सिक्स मारकर दिखाओ, मैं तुम्हे नही मारने दूंगा,
असं आव्हान दिलं.
यावर सचिनने,
मै आपको कैसे मार सकता हूं, आप तो इतने अच्छे बॉलर है,
असं उत्तर दिलं.
…आणि ठोकले तीन षटकार
पण सचिननं त्याचं हे वाक्य खोटं ठरवत कादिरची कदर न करता धुलाई करायला सुरुवात केली. त्याने कादिरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. एवढ्यावर तो थांबला नाही तर त्याने त्या एका ओव्हरमध्ये तीन षटकार आणि एक चौकार ठोकत 27 धावा काढल्या. त्या मॅचमध्ये सचिनने नाबाद 53 धावा केल्या. त्याच्या या झंझावाती खेळीमुळे मैदानातल्या प्रेक्षकांनी अक्षरशः जल्लोष केला. इतकंच नाही तर त्याने संघ व्यवस्थापनाचे देखील लक्ष वेधून घेतले. त्यानंतर सचिनला पुढच्या आंतरराष्ट्रीय वन-डेमध्ये खेळवण्यात आले.
त्याच्या या खेळीची आठवण सांगताना एका मुलाखतीत अब्दुल कादिरने स्वतः त्याचे कौतुक केले. मी सचिनला लॉलिपॉप बॉलिंग केली नव्हती. सचिनला आऊट करण्यासाठी मी माझा संपूर्ण अनुभव पणाला लावला होता. पण तरीही त्याने मला तीन षटकार ठोकले. सचिनचा अपवाद वगळता माझ्या 18 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एका ओव्हरमध्ये मला कोणीही तीन षटकार ठोकले नव्हते, अशी कबुली कादिरने दिली.
(ही माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला सचिनच्या अशा एखाद्या खेळीचा किस्सा आठवत असेल, तर तो ही शेअर करा.)
Join Our WhatsApp Community