महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे ३ मेपर्यंत खाली उतरवा अन्यथा दुप्पट क्षमतेने हनुमान चालिसा लावू, असा अल्टिमेटम दिले आहे. तेव्हापासून राज्य सरकार तणावाखाली आले आहे. त्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवार, २५ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. त्या बैठकीसाठी राज ठाकरे यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे, मात्र त्या बैठकीला राज ठाकरे जाणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
बाळा नांदगावकर जाणार
ही बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर होणार आहे. पण या बैठकीत मनसे अधयक्ष राज ठाकरे जाणार नाहीत. राज ठाकरे यांच्याऐवजी मनसेकडून बाळा नांदगावकर पक्षाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. भोंग्याबद्दल चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सरकारने निमंत्रण दिले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हा धार्मिक नाही तर सामाजिक विषय आहे, असे सांगत भोंगे खाली उतरवण्यास सांगितले आहे. त्यामुळे काही मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबतची भूमिका जाहीर केल्यापासून अनेक धमकीचे फोन आले आहेत. पण तरीही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. राज ठाकरेंच्या भोंग्याबाबतच्या भूमिकेवरुन राज्यात काही गैरप्रकार घडू नये म्हणून राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणांकडून काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गोपनीय अहवालाचा उल्लेख करत राज्यात 3 मे नंतर काहीतरी विस्फोटक परिस्थिती उद्भवू शकते, असा दावा केला होता. तसेच या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती दिली होती.
(हेही वाचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या दौऱ्यात गैरहजर! आतापर्यंत किती वेळा पंतप्रधानांना टाळले?)
Join Our WhatsApp Community