किरीट सोमय्यांच्या कारवर शनिवारी झालेल्या हल्ल्यानंतर भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीत केंद्रीय गृहसचिव भेटीला गेले. किरीट सोमय्यांच्या भेटीबाबत जेव्हा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी भाजपवर टीका केली. महाराष्ट्रात जर राष्ट्रपती राजवट लावायची असेल, तर उत्तर प्रदेशमध्येही राष्ट्रपती राजवट लावा. असा टोला त्यांनी लगावला आहे. उत्तर प्रेदशात राष्ट्रपती राजवट लावण्यात यावे कारण, उत्तर प्रदेशात 17 बलात्कार झाले आहेत. उत्तर प्रदेशात जे झाले आहे, त्याचीही माहिती गृहसचिवांना द्यावी, असे राऊत यावेळी म्हणाले.
महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षड्यंत्र
तुम्हाला राज्यात काहीही प्रश्न असतील, तर तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटा, मुख्यमंत्र्यांना भेटा. उत्तर प्रदेशात 17 बलात्कार झाले, त्याच्याविषयी बोला. राष्ट्रपती राजवट लावायची असेल, तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात एकत्र लावावी. दोन चार लोक येतात दिल्लीत उतरतात, गृहसचिवांना भेटतात. हे सगळं महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. रक्त आलं तर चालले राष्ट्रपती राजवट लावायला. चांगल्या अधिका-यांवर असे आरोप करु नयेत, संजय पांडे हे चांगले अधिकारी आहेत.
गृहसचिवांचे आश्वासन
किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी, दाद मागण्यासाठी हे शिष्टमंडळ दिल्लीत पोहोचले. या बैठकीत किरीट सोमय्यांनी निवेदन दिले आहे. गृहसचिवांच्या भेटीनंतर किरीट सोमय्यांसह राज्यातील इतर व्यक्तींवर झालेले हल्ले हे चिंताजनक असून महाराष्ट्रातील परिस्थितीचा अभ्यास करुन गरज पडली, तर केंद्रीय गृहखात्याची टीम महाराष्ट्रात पाठवू, असे आश्वासन केंद्र सरकारचे गृहसचिव अजय भल्ला यांनी दिल्याचे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community