राणा दाम्पत्य यांना मातोश्री येथे हनुमान चालीसा म्हणण्यापासून प्रतिबंध करण्याकरता शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या खार येथील घरासमोर आंदोलन केले. पोलिसांनी अखेर राणा दाम्पत्य यांना अटक केली. त्यांना जेव्हा खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले, तेव्हा तिथे भाजपचे नेते किरीट सोमय्या भेटायला गेले, त्यावेळी सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्याच्या प्रकरणी शिवसेनेचे माजी महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी अटक केली. तसेच हाजी आलम, शेखर वायंगणकर आणि दिनेश कुबल यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर महाडेश्वर यांना लगेचच जामीन मंजूर करण्यात आला.
महाडेश्वरांच्या अटकेमुळे शिवसेनेची जबाबदारी वाढणार
जेव्हा किरीट सोमय्या हे खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्याना भेटायला गेले, त्यावेळी तिथे मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. जेव्हा सोमय्या तेथून निघून जायला निघाले, तेव्हा मात्र शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली, तसेच बाटल्या फेकल्या, त्यावेळी सोमय्या यांच्या गालावरून रक्त वाहताना दिसत होते. या हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमय्या दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहसचिवांना भेटून हल्ल्याबाबतची माहिती दिली. त्यानंतर काही तासांतच माजी महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी अटक केली. त्यामुळे या हल्ल्याच्या प्रकरणात शिवसेनेची जबाबदारी स्पष्ट झाली आहे. या विषयावर बोलताना भाजपचे नेते, आमदार अतुल भातखळकर म्हणाले, शिवसेनेने महापालिकेत भ्रष्टाचार केला, मराठी माणसाची घरे लुटली, आम्ही काही झाले तरी त्यांची पोलखोल करतच राहणार.
Join Our WhatsApp Community