विंचूदंशावर करण्यात आलेल्या लसनिर्मितीच्या संशोधनावरून आता श्रेयवाद रंगला आहे. डॉ. बावस्कर यांनी वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना विंचूदंश प्रतीलसीचे संशोधन मी केले आहे, असे म्हटले होते. मात्र यावर आक्षेप घेत पद्मश्री मिळालेल्या माणसाकडून असे खोटे प्रतिपादन करणे ही अतिशय गंभीर गोष्ट आहे, या शब्दांत डॉ. विजय नातू यांनी टीका केली आहे. सोमवारी पत्रकार परिषद घेत डॉ. विजय नातू, डॉ. संतोष कामारेकर यांनी डॉ. बावस्कर यांच्याविरोधातली आपली भूमिका जाहीर केली.
( हेही वाचा : पोलीस दलात ७ हजार २३१ पदांची भरती! )
अतिशय गुंतागुंतीच्या शास्त्रीय अडचणींमुळे विंचूदंश लसीची निर्मिती ही सर्पदंश लस निर्माण करण्यापेक्षा अतिशय कठीण म्हणजे जवळजवळ अशक्य आहे. प्रत्येक देशाला त्या-त्या देशात विंचूदंश लस निर्माण करावी लागते. कारण प्रत्येक देशातील विंचवाच्या विषात थोडा फरक असतो. जगात काही मोजक्या देशांनाचा विंचूदंश लस तयार करता आली आहे. ज्यामध्ये फ्रान्स, ब्राझील व भारताचा समावेश आहे. सर्पदंश लस ही हाफकिनने 1895 मध्ये तयार केली मात्र विंचूदंश लस 1997 साली म्हणजे 102 वर्षानंतर, निर्माण झाली, अशी माहिती दोन्ही डॉक्टरांनी दिली.
विंचूदंश लस 1997 पासून उपलब्ध आहे. 11 वर्ष 2008 पर्यंत डॉ. बावस्कर विंचूदंश लस उपयोगी नाही असे सांगत होते. मात्र 2006 साली आमचे संशोधन त्यांना सांगितल्यानंतर आमच्या संशोधनाची शिताफीने चोरी करून त्यांनी शोधनिबंध प्रसिद्ध करून त्यांचेच संशोधन आहे असे म्हणणे म्हणजे हाफकिनच्या संशोधकांचा अपमान आहे, या शब्दांत डॉ. संतोष कामरेकर यांनी संताप व्यक्त केला.
डॉ. बावस्कर यांचे प्राझोसिनबाबतचे योगदान नाकारता येत नाही. पण रुग्ण दोन दिवसांपर्यंत गंभीर राहत असे व त्याला आयसियूमध्ये डॉक्टरांच्या सतत देखरेखीखाली 36-48 तास वाचवण्यासाठी प्रयत्न करायला लागायचे. त्या उपचार पद्धतीने मृत्यूदर कमी झाला हे मान्य आम्हाला देखील मान्य आहे. मात्र विंचूदंश प्रतीलसीचे संशोधन हे हाफकिन इन्स्टिट्यूट आणि हाफकीनच्या संशोधकांचे संपूर्ण श्रेय आहे, असे डॉ. विवेक नातू म्हणाले.
काय आहे वाद?
1980 ते 1995 या काळात हाफकिन इन्स्टिटयूटमार्फत विंचूदंश लस निर्माण करण्यासाठी बरेच जण शासकीय पातळीवर प्रयत्न करत होते. कारण कोकणामध्ये अलिबाग ते सिंधुदुर्ग विंचूदंशामुळे मृत्यू अधिक प्रमाणात होत होते त्यामध्ये डॉ. द. नातू, माजी आरोग्यमंत्री भाई सावंत , दौलतराव आहेर, माजी केंद्रीय आरोग्यमंत्री बॅ. अंतुले यांचा समावेश आहे. हाफकिनचे डॉ. काणकोणकर व डॉ. शिरोडकर यांनी 20 वर्ष अथक संशोधन करून विंचूदंश लसीची निर्मिती केली. त्यापूर्वी 1997 पूर्वी प्राझोसिनची (गोळी देऊन) उपचार आणि त्यासाठीच्या अभ्यासात डॉ. बावस्कर यांनी काम केले आहे.
पत्रकार परिषद घेत डॉक्टरांनी मांडली बाजू
डॉ. विवेक नातू, डॉ. रवी बापट, डॉ. संतोष कामेरकर यांच्या 10 वर्षाच्या अथक संशोधनानंतर विंचूदंश प्रतीलस उपलब्ध झाल्यावर रुग्ण 2 ते 4 तासांत बरे होऊ लागले असे डॉ. विवेक नातू यांनी सांगितले. आमचा पहिला शोधनिबंध 2006 साली प्रसिद्ध झाला, त्या संशोधनाला त्याच वर्षीचा ओरिगिनल संशोधनाचा प्रथम पुरस्कार मिळाला. त्यात आम्ही असे नमूद केले होते की प्राझोसिन दिलेल्या रुग्णाला विंचूदंश लस दिल्यास रुग्ण वेगाने बरा होतो. 2006 आमचा पेपर प्रसिद्ध झाल्यानंतर माझे संशोधन महाडमध्ये 100 डॉक्टरांसमोर डॉ. बावस्कर यांना दाखवले. त्यानंतर 2011 मध्ये म्हणजे आमचे संशोधन प्रसिद्ध झाल्यानंतर डॉ. बावस्करांचा संशोधन निबंध प्रसिद्ध झाला त्यात त्यांनी 2007 मध्ये आमचे संशोधन माहीत असल्यामुळे 2008-2009 मध्ये आमच्या संशोधन पद्धतीमध्ये चोरी करून थोडेफार फेरफार करून एकदम भूमिका बदलून त्यांचा शोधनिबंध प्रसिद्ध केला, असा आरोप डॉ. नातू आणि डॉ. कामेरकर यांनी केला आहे.
लस हाफकिनने बनविली – डॉ. हेमंत बावस्कर
ही लस मी बनविली असे मी केव्हाच बोललेलो नाही. तसेच लस बनविण्यात असलेले हाफकिनचे महत्त्व देखील मी माझ्या बोलण्यातून कमी केलेले नाही. लस हाफकिनने बनविली आहे. तसेच डॉ. विवेक नातू आणि डॉ. संतोष कामेरकर यांनी तसेच त्यांच्या टीमने देखील उत्तम काम केलेले आहे आणि ते देखील मी नाकारत नाही. माझे या क्षेत्रात 1976 पासून काम सुरू आहे. त्यामुळे कोणाचे महत्त्व कमी करणे किंवा भावना दुखावणे असा माझा हेतू नाही. मी या विषयात काम करत राहणार आहे.
Join Our WhatsApp Community