मुंबईमध्ये मान्सूनपूर्व धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा सर्वे करण्यात येत असून अतिधोकादायक इमारतींना नोटीस पाठवून त्या इमारती त्वरीत महापालिकेच्यावतीने खाली करायला भाग पाडल्या जातात. अशाप्रकारे मुंबईत सुमारे ३५० अतिधोकादायक इमारती असल्याची माहिती समोर येत आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा इमारतींची संख्या कमी असून यासर्व इमारतींना महापालिकेच्यावतीने नोटीस बजावण्यात आली आहे.
( हेही वाचा : मुंबई, ठाणे, पुणे आणि अहमदनगर पुन्हा अलर्टवर )
सुधारीत यादी बनवण्याची प्रक्रिया सुरु
पावसाळ्यात अतिधोकादायक इमारती कोसळून दुघर्टना होण्याचे प्रकार घडत असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून अशा इमारतींना नोटीस पाठवून त्या खाली केल्या जातात. तर काही इमारती जमिनदोस्त केल्या जातात, तर काहींचे वीज पाणी तोडले जाते. मागील वर्षी अशाप्रकारे एकूण ४८५ अतिधोकादायक इमारतींना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यामध्ये ४२४ खासगी इमारती तर २७ इमारती या सरकारी आणि ३४ इमारती या महापालिकेच्या अखत्यारितील होत्या. मागील वर्षी १५०हून अधिक इमारती जमिनदोस्त करण्यात आल्या होत्या होत्या तर शंभरहून अधिक इमारती या खाली करण्यात आल्या होत्या. काही प्रकरणे न्यायालयात असल्याने त्यांच्यावरील कारवाई प्रलंबित होती.
परंतु यंदा केलेल्या पाहणी सर्वेमध्ये सुमारे ३५० इमारती धोकादायक असल्याची माहिती समोर आली असून यासर्वांना महापालिकेच्या विभाग कार्यालयांच्या माध्यमातून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यासर्व इमारती सी वन श्रेणीतील असल्याने त्यांना या नोटीस बजावण्यात आल्याचे बोलले जात आहे. यामध्ये बहुतांशी खासगी इमारतींचा समावेश आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा पुन्हा एकदा विभाग कार्यालयाच्या माध्यमातून पाहणी केली जात असून त्यानुसार सुधारीत यादी बनवण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
मागील तीन वर्षांमधील धोकादायक इमारती
- सन २०२१ : ४८५
- सन २०२० : ४४३
- सन २०१९ : ४९९