नुसती चर्चा नाही, तर आम्ही कामं करतो: उद्धव ठाकरे यांचा भाजपला चिमटा

130

उद्योगांच्या ईझ ऑफ डुईंग प्रमाणेच आपण नागरिकांच्या ईझ ऑफ लिव्हिंगच्या – आयुष्याचा विचार करत आहोत. शेवटी प्रवास हा विकासाचाही असायला हवा. त्यामध्ये आरोग्यासह, पर्यावरणाचाही विचार करत आहोत. प्रदूषण वाढते आहे, उष्णता वाढते अशी नुसती चर्चा करत नाही. तर त्यावर काम ही करत आहोत, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेस्ट उपक्रमाच्या कार्यक्रमात बोलत अप्रत्यक्षपणे भाजपला चिमटा काढला.

( हेही वाचा : राणा प्रकरणात शिवसेनेनं काय कमावलं आणि काय गमावलं )

मुंबईकरांची सुट्ट्या पैश्यांची कटकट दूर

मुंबई महानगरपालिकेचा बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम – बेस्टच्या “नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड” – एनसीएमसीचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात ते बोलत होते. मी बेस्टच्या आयुष्याचाही प्रवास अनुभवला आहे. बेस्टचे अधिकारी, कर्मचारी नेहमीच पुढे चला..पुढे चला म्हणूत अथकपणे लोकांच्या सेवेत असतात. कोरोनाच्या संकटातही एस.टी. आणि बेस्टने अलौकीक असे योगदान दिले आहे. माझा उल्लेख लोकप्रिय मुख्यमंत्री असा केला जातो. पण हे बिरुद माझ्या नावासमोर लागण्यासाठी माझ्या या कुटुंबातील तुम्हा सर्वांचे श्रेय आहे. तुम्ही मेहनतीने बेस्टचं, मुंबई महापालिकेच्या कामाचं एक माँडेल उभे केले आहे. या कामांचे कौतुक उच्च, सर्वोच्च न्यायालय आणि न्यू यार्क टाईम्सनेही केले आहे. या कार्डच्या सुविधेच्या माध्यमातून मुंबईकरांची सुट्ट्या पैश्यांची कटकट दूर केली असल्याचे सांगितले.

बेस्टने अत्यंत माफक दरात उत्तम सुविधा उपलब्ध करून दिली

ज्यांच्या कष्टाच्या जीवावर, घामांवर केवळ राज्यच नव्हे, तर देशाची अर्थव्यवस्था उभी आहे. त्या मुंबईकरांसाठी आम्ही काम करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.बेस्ट अनेक उपक्रमांत पहिल्या क्रमांकावर आहे. या उपक्रमासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही देऊन मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, बेस्टने अत्यंत माफक दरात उत्तम सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेनेही शिक्षण, आरोग्यात उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. मुंबईतील महापालिकेच्या शाळेचा दर्जा हा आता अन्य शाळांत शिकणाऱ्या मुंलाच्या पालकांसाठीही आकर्षण ठरू लागले आहे. मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गणवेशातील मुलांना बेस्टच्या बसने मोफत प्रवास करण्याची मुभा आहे. यापुढे खासगी शाळांतील मुलांसाठीही कमी दरातील बस पास सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. अन्य शाळेत शिकणाऱ्यां मुलांच्या पालकांना जसे आपल्या मुलांनाही महापालिकेच्या जावे असे वाटू लागले आहे. असा या शाळांचा दर्जा आहे. त्याचप्रमाणे आता सर्वांना बेस्टने प्रवास करावे असे वाटेल. आम्ही जे करत ते बेस्टच करतो, ते यापुढेही करत राहू. या जनतेसाठीच्या सेवेत ज्यांना-ज्यांना खासगी संस्थाना सेवा, ज्ञानाचे योगदान द्यायचे आहे, त्यांचे स्वागतच केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बेस्ट बस प्रवासाच्या आठवणींनाही उजाळा

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या शालेय जीवनातील बेस्ट बस प्रवासाच्या आठवणींनाही उजाळा दिला. सोहळ्यात बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटीच्या ४८३ कोटी रुपयांच्या निधीचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते कळ दाबून डिजिटली वितरण करण्यात आले. बेस्टचे महाव्यवस्थापक चंद्रा यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते एनसीएमसी कार्डचे अनावरणाद्वारे लोकार्पण करण्यात आले. बेस्टच्या व्हिजन डॉक्युमेंटचेही प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यास महापालिका, बेस्ट उपक्रमाचे अधिकारी, कर्माचाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेस्टच्या कुलाबा आगारातील ईलेक्ट्रीकल हाऊसच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हयाचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आयुक्त इक्बालसिंह चहल, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आशिष चेंबुरकर आदी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.