किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे चर्चेत आले आहेत. खार पोलीस ठाण्याच्या बाहेर किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्यानंतर वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून घेण्यासाठी गेलेले सोमय्या यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना बोलवा तेव्हाच मी गाडीतून बाहेर येऊन तक्रार दाखल करणार असा हट्टहास केला होता. मात्र पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे आणि भाजपच्या काही नेत्यांनी सोमय्या यांची समजूत काढल्यानंतर ते पोलीस ठाण्यात दाखल झाले. मात्र मी सांगेन त्या प्रकारे एफआयआर दाखल करण्यात यावा, असाही हट्ट वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्ये केला होता. सोमय्या यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना देखील संजय पांडे यांना लक्ष केल्यामुळे पांडे चर्चेत आले आहेत.
‘आम्हाला खार पोलीस ठाण्यात हीन दर्जाची वागणूक देण्यात आली’ असा आरोप राणा दाम्पत्याकडून करण्यात आला आहे. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी खार पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज ट्विट केले आहे. त्यात खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्याला पोलिसांकडून खुर्चीवर बसवून चहा देत त्यांच्याशी पोलीस सौजन्याने वागत असल्याचे दिसत आहे. या ट्विटमुळे पांडे पुन्हा चर्चेत आले आहेत.
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविषयी…
संजय पांडे हे १९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. कानपूर येथून आयआयटीचे पदवीधर असलेले पांडे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. १९९२ मध्ये संजय पांडे हे मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून परिमंडळ ८ ची जबाबदारी स्वीकारली होती. १९९२-९३ च्या मुंबईतील दंगलीत पांडे हे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. दंगलीच्या काळात संपूर्ण मुंबईत तणावाचे वातावरण होते, मात्र संजय पांडे यांनी आपल्या शहाणपणाच्या जोरावर अल्पावधीतच परिस्थिती नियंत्रणात आणली होती. धारावी सारख्या विभागात पांडे यांनी दंगलीच्या काळात तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली होती. धारावीच्या कार्यकाळामध्ये समाजात त्यांचे कौतुक झाले मात्र एका राजकीय पक्षाचा रोष त्यांना ओढून घ्यावा लागला होता. त्याचबरोबर अनेक राजकीय नेते पांडे यांच्या विरोधात गेले होते.
संजय पांडे हे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त असताना १९९७ मध्ये ‘कॉबलर स्कॅम ‘ (बुटांचा घोटाळा) समोर आला होता, या घोटाळ्याचा तपास पांडे हे करीत होते, या घोटाळ्यात अनेक राजकीय नेत्याचे हात बरबटले होते, हे तपासात समोर आले. या घोटाळ्यानंतर पांडे यांनी राजकीय वैर ओढून घेतले होते, परिणामी पांडे यांची जालना मध्यवर्ती येथे बदली करण्यात आली. त्यानंतर पांडे हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले आणि पंतप्रधानाच्या सुरक्षा युनिटमध्ये त्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर पांडे यांनी पोलीस दलाचा राजीनामा दिला आणि खाजगी क्षेत्रात रुजू झाले. मात्र, राज्य सरकारने वर्षभरानंतरही त्यांचा राजीनामा स्वीकारला नसल्यामुळे ते पुन्हा पोलीस दलात रुजू झाले. तेव्हापासून त्यांचा राज्य सरकारशी वाद सुरु होता. पांडे यांना तीन वर्षांहून अधिक काळ ‘अनिवार्य प्रतीक्षा’वर ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली, न्यायालयाच्या मंजुरीनंतरच पांडे यांना डीजी होमगार्डची पोस्टिंग मिळाली होती.
(हेही वाचा – औरंगाबादमध्ये जमावबंदी नाही, राज ठाकरेंच्या सभेबद्दल पोलीस आयुक्त काय म्हणाले?)
वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी विविध प्लॅटफॉर्मवर साइड पोस्टिंगबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर पांडे यांना गेल्यावर्षी ९ एप्रिल रोजी राज्याचे प्रभारी पोलीस महासंचालक करण्यात आले होते. युपीएसी नामांकन समितीने निवडलेल्या तीन आयपीएस अधिका-यांमध्ये पांडे नसताना त्यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आला होता. त्यांच्या नियुक्ती विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यानंतर त्यांची या पदावरून बदली करण्यात आली होती. तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त नगराळे यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात आल्यानंतर संजय पांडे यांना मुंबई पोलीस आयुक्त करण्यात आले आहे. संजय पांडे यांचा कार्यकाळ कमी असून जून महिन्यात ते पोलीस सेवेतून निवृत्त होत आहेत. मात्र महविकास आघाडीकडून त्यांचा कार्यकाळ वाढवून देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Join Our WhatsApp Community