‘झुकेगा नही’ म्हणणाऱ्या शिवसैनिक आजी म्हणतात ‘घर देता का घर’!

222

राणा दाम्पत्य मुंबईत येतात, थेट मातोश्रीच्या समोर हनुमान चालीसा म्हणण्याचा आग्रह धरतात. त्याला विरोध करण्यासाठी अनेक वर्षांनी प्रथमच शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतात. या शिवसैनिकांमध्ये एका शिवसैनिक आजी माध्यमांचे लक्ष वेधून घेतात. त्या आजींचे नाव आहे चंद्रभागा शिंदे, वय ८२! ‘मातोश्री’ बाहेर जमलेल्या शिवसैनिकांमध्ये आजी चंद्रभागा शिंदे यांच्याकडे माध्यमांचे कॅमेरे वळले आणि आजींनी पुष्पा चित्रपटाचा डायलॉग मारला. झुकेगा नही…असे म्हणत आजींनी शिवसैनिकांमध्ये उत्साह भरला. या आजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इतक्या महत्वाच्या वाटल्या की त्यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चक्क पंतप्रधानांच्या मुंबईच्या दौऱ्याला गैरहजेरी लावली. ‘या आजी खऱ्या शिवसैनिक आहेत, बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या झुकणाऱ्या नाहीत’, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आजींचे कौतुक केले आणि दुसऱ्याच क्षणी आजींनी मुख्यमंत्र्यांकडे ‘माझ्या कुटुंबासाठी घर द्या’, अशी मागणी केली. ८२ वर्षीय शिवसैनिक आजी एका बाजूला शिवसेनेसाठी झुकेंगा नही म्हणतात, त्याच वेळी वाढत्या कुटुंबाला सामावून घेण्यासाठी पर्याप्त मोठे घर द्या असेही म्हणतात. आजी चंद्रभागा यांची ही स्थिती मुंबईतील शेकडो शिवसैनिकांचे प्रतिनिधित्व करते.

पंतप्रधानांपेक्षा महत्वाच्या वाटल्या शिवसैनिक आजी! 

रविवारी, २४ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दौऱ्यावर होते. ‘लता मंगेशकर पुरस्कार’ स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरता न जाता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चक्क शिवसैनिक आजी चंद्रभागा शिंदे यांना भेटण्यासाठी परळ येथे आले. त्यासाठी पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे सर्व जण त्यावेळी होते. जेव्हा ठाकरे कुटुंब आजींच्या घरी आले, तेव्हा माध्यमांनीही गर्दी केली होती. माध्यमांचे प्रतिनिधी ठाकरे कुटुंबिय आणि आजींचा परिवार हे सर्व घरात एकत्र येताच कुणालाही बसायला जागा उरली नाही. घर संपून गेले होते. उभ्या उभ्या ठाकरे कुटुंबाने आजींचे कौतुक केले, मिठाया वाटल्या, फोटो काढून घेतले, माध्यमांना मुलाखती दिल्या, त्याचवेळी आजींनी पुन्हा एकदा ‘झुकेगा नही’, असा डायलॉग मारला. असा सगळा कार्यक्रम आटोपल्यावर आजींनी मनात दाबून ठेवलेली इच्छा बोलून दाखवली. आजी म्हणाल्या, माझा परिवार वाढला आहे, घर अपुरे पडतेय आम्हाला घर द्या. मुख्यमंत्री ठाकरे यांनी लागलीच तिथे उपस्थित माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना या मागणीकडे लक्ष देण्याचे आदेश दिले आणि मुख्यमंत्री निघाले.

(हेही वाचा काँग्रेसला शिवसेना संपवतेय का? काँग्रेसच्या नेत्यांना का वाटतंय असं)

मुंबईतील शिवसैनिकांचे प्रतिनिधित्व करतात आजी चंद्रभागा शिंदे! 

आजी शिवसैनिक चंद्रभागा शिंदे यांनी मांडलेली व्यथा ही मुंबईतील शेकडो शिवसैनिकांचे प्रतिनिधित्व करते. सेनेच्या स्थापनेपासून मुंबईतील शेकडो शिवसैनिक असे आहेत ज्यांनी बाळासाहेबांवरील श्रद्धेपोटी शिवसेनेसाठी संपूर्ण आयुष्य वेचले. खासकरून लालबाग, परळ, दादर या गिरणगावातील शिवसैनिक मागील ४-५ दशके १० बाय १० च्या खोलीत कुटुंबकबिल्यासह राहत आहेत. एका बाजूला पक्षासाठी आयुष्य वेचणारा शिवसैनिक जो चाळीत वर्षानुवर्षे राहतोय आणि दुसरीकडे आयकर खात्याच्या विळख्यात अडकलेले शिवसेनेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव ज्यांच्याकडे मुंबईत ५० हुन अधिक फ्लॅट्स आहेत. जसे शिवसैनिक आजी शेकडो गरीब शिवसैनिकांचे प्रतिनिधित्व करतात, तसे यशवंत जाधव हे देखील शिवसेनेच्या एका विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. आज शिवसैनिक आजी चंद्रभागा शिंदे यांच्या माध्यमातून खऱ्या तळागाळातील शिवसैनिकांची काय स्थिती आहे, ही अधोरेखित झाली आहे. मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनीही यावर सडेतोड भाषेत टीका करणारे ट्विट केले. ‘‘फायर आजींची भेट घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आजीने ‘हातच्या कंकणाला आरसा कशाला’ अशी परिस्थिती दाखवून दिली…! कट्टर शिवसैनिक अजूनही हक्काचे घर आणि नोकरीपासून आजही वंचित,” असे म्हणत शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.