मनसेची सभा होणारच! बाळा नांदगावकर औरंगाबादमध्ये दाखल

138

येत्या १ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील होणाऱ्या सभेसाठी मनसे पदाधिकारी सज्ज झाले आहेत. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मनसे नेते बाळ नांदगावकर बुधवारी औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. शहरात दाखल झाल्यानंतर बाळा नांदगावकर हे औरंगाबाद पोलीस आयुक्तांची भेट घेणार असून त्यांच्याकडे राज ठाकरे यांच्या सभेसाठी परवानगी मागणार आहे. यावेळी नांदगावकर स्वतः मराठवाडा सांस्कृतिक मंडळ या मैदानाची पाहणी करणार असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – मनसेची १ मे रोजी औरंगाबादेत सभा; २९, ३० एप्रिलला राज ठाकरे कुठे असणार?)

मनसेची सभा होणारच…

१ मे रोजी होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला अवघे चार दिवस बाकी असताना अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेले नाही. त्यामुळे ही सभा होणार की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. असे असतानाही आम्ही पोलिसांची भेट घेऊन रितसर परवानगी मागणार आहोत आणि पोलिसांकडून देखील या सभेला परवानगी निश्चित देतील, असा विश्वास बाळा नांदगावकरांनी व्यक्त केला आहे.

(हेही वाचा – मनसे सज्ज! औरंगाबाद सभेपूर्वीच पुण्याहून मागवले ५० हून अधिक भोंगे)

दरम्यान राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यानंतरही ज्या मशिदीवर भोंगे वाजतील त्या मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजणार, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान, आता मनसे कार्यकर्त्यांकडून भोंगे खरेदीला सुरवात झाली आहे. औरंगाबादच्या सभेसाठी मनसेकडून ५० हून अधिक भोंगे खरेदी करण्यात आले असल्याची माहिती मिळतेय.

पुण्यातून ५० पेक्षा अधिक भोंग्यांची खरेदी

पुण्याहून ५० हून अधिक भोंगे औरंगाबादच्या सभेसाठी खरेदी करण्यात आल्याची माहिती मनसेच्या नेत्यांकडून देण्यात आली. इतकेच नाही औरंगाबादेतील पदाधिकाऱ्यांनी १५०० ते १८०० रुपये दराने पुण्यातून ५० पेक्षा अधिक भोंग्यांची खरेदी केली आहे. तसेच हे भोंगे बॅटरीवर चालणारे असून या भोग्यासाठी वीज लागत नसल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर बुधवारी औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बैठक घेणार असून औरंगाबाद पोलीस आयुक्तांचीही भेट घेणार आहे.

मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला पाच दिवस बाकी असताना अद्याप औरंगाबाद पोलिसांनी या सभेसाठी मनसेला परवानगी दिलेली नाही. औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू केल्याचे सांगितले जात होते. या आदेशानंतर सभेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. दरम्यान, औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आल्याचे वृत्त चुकीचे असल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.