जन्मजात मुलांना ऐकण्याची किंवा बोलण्याची समस्या उद्भवल्यास कित्येक पालकांना याची नेमकी कल्पना येईपर्यंत दोन-तीन वर्ष लागतात. मूल शाळेत गेल्यानंतर बोलू लागेल या आशेमुळे कित्येकदा वेळ निघून जातो. अशातच डॉक्टरांकडे धाव घेतल्यानंतर शस्त्रक्रिया सूचवली जाते. या शस्त्रक्रियेसाठी राज्य सरकारने सार्वजनिक खासगी सहभाग (पीपीपी)अंतर्गत आता मोफत शस्त्रक्रिया उपलब्ध केली आहे. वर्सोवा येथील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात वंचित कुटुंबातील १२६ मुलांना या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून जगण्याची नवी उमेद मिळाली आहे.
( हेही वाचा : धक्कादायक! अर्ध्या लोकांना नकोय नोकरी, हे आहे कारण; अहवालातून माहिती समोर )
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या सहयोगातून गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात या जन्मजात कर्णबधीर रुग्णांच्या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. कोक्लिअर इम्लान्ट या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून कानातील स्नायूंना बळकटीकरण मिळते. त्यामुळे मुलांना ऐकायला येते. बोलणे ऐकायला आणल्यास तोंडातून शब्दही उच्चारायला सुरुवात होते. या मुलांच्या जन्मजात आजाराबाबत पालक अनभिज्ञ असतात. परिणामी, डॉक्टरांकडे गेल्यानंतर ग्रामीण भागांत आवश्यक चाचण्याच उपलब्ध होत नाहीत. परिणामी, मुले या शस्त्रक्रियांपासून आर्थिक परिस्थिती तसेच वैद्यकीय सोयीसुविधांच्या अनुपलब्धतेमुळे वंचित राहतात, असे कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयाचे कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. संजीव बधवार यांनी सांगितले.
खासगी रुग्णालयात कोक्लिअर इम्पान्ट या शस्त्रक्रियेचा खर्च ७ ते १८ लाखांपर्यंत जातो. त्यामुळे पीपीपीच्या माध्यमातून ही शस्त्रक्रिया वंचित घटकांतील जन्मजात मुलांसाठी वरदान ठरत असल्याची प्रतिक्रिया कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. संजीव बधवार यांनी दिली. या मुलांची शस्त्रक्रियेअगोदरची सिटी स्कॅन, एमआरआय तसेच अल्ट्रासाऊण्ड या तपासण्या तसेच मुलांच्या आणि पालकांच्या राहण्याचा खर्च धीरुबाई अंबानी रुग्णालयाकडून केला जात आहे.
ही आहे धोक्याची घंटा
तुमचा मुलगा तुमच्या बोलण्याकडे प्रतिसाद देत नसल्यास हे ऐकू न येण्याचे प्राथमिक लक्षण आहे. त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. दोन वर्षांच्या आतच शक्यतो मुलांवर उपचारास सुरुवात व्हायला हवी.
कशी होते शस्त्रक्रिया
ऐकू येण्यासाठी कानात लावले जाणारे कोक्लिअर इम्पाल्न्ट दोन प्रकारे लावले जाते. एक भाग कानात आणि एक भाग कानाबाहेर लावला जातो. इम्पाल्न्ट मशीन महिन्याभरानंतर सुरु केले जाते. कानातील स्नायूंच्याजवळ आवाज पोहोचल्यानंतर मुलाला बोलायला मदत होते. ही स्पीच थेअरपी दोन वर्ष चालते.
या जिल्ह्यांतील मुलांवर झाली शस्त्रक्रिया
अकोला, जालना, उस्मानाबाद, जळगाव, सोलापूर, शिर्डी, गडचिरोली, मुंबई, कोकण आणि यवतमाळ.
Join Our WhatsApp Communityआपल्या देशात शाळेत जाण्याच्या वयात असलेल्या कर्णबधीर मुलांची संख्या खूप आहे. पण या समस्येची तपासणी करण्यासाठी विशेष कार्यक्रम नसल्यामुळे या समस्या लक्षात येत नाहीत. मुलेही उपचारांपासून वंचित राहतात. या गरजू रुग्णांना उपचार देण्यासाठी आम्ही राज्य सरकारला मदत करत आहोत.
– डॉ. संतोष शेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक, कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालय, वर्सोवा