मागच्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. कोरोना रुग्ण संख्येत होणा-या या वाढीमुळे केंद्र सरकारने आता कोवीड लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोस यांमधील अंतर कमी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट म्हणजेच NTAGI हे अंतर कमी करण्यासाठी शिफारस करु शकते, ज्यावर 29 एप्रिल रोजी बैठक होणार आहे.
अंतर होणार कमी
ICMR च्या तपासणीत असे आढळून आले की, लसीकरणानंतर सुमारे सहा महिन्यांनंतर अॅंटीबाॅडीजची पातळी कमी होऊ लागते. बूस्टर डोस दिल्याने रोगप्रतिकारशक्तीची क्षमता वाढते. त्यामुळे दुसरा डोस आणि बूस्टर डोस यांमधील अंतर 9 महिन्यांवरुन 6 महिन्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा: धक्कादायक! अर्ध्या लोकांना नकोय नोकरी, हे आहे कारण; अहवालातून माहिती समोर )
मुख्यमंत्र्यांचे आवाहन
राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला उंबरठ्यावरच रोखायचे असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील, तर नागरिकांनी स्वत:हून मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रुग्णांमध्ये फ्ल्यू सदृष्य लक्षणे आढळल्यास त्यांची तत्काळ आरटीपीसीआर टेस्टींग करा, राज्यातील टेस्टिंगची संख्या तसेच लसीकरणाचा वेग वाढवा अशा सूचनाही दिल्या.