या मंत्र्यांच्या उचलेगिरीमुळे महापालिकेच्या राजशिष्टाचाराची ऐशीतैशी

170

मुंबई महापालिकेत येणाऱ्या परदेशी पाहुण्यांसह महापालिका आयुक्त तसेच महापौरांचा राजशिष्टाचार(प्रोटोकॉल) जपणाऱ्या महापालिकेच्या राजशिष्टाचार विभागातील अधिकाऱ्यालाच उचलून या खात्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्याकडे नेले आहे. महापालिकेच्या राजशिष्टाचार विभागात सध्या ११ पैकी ३ अधिकारीच कार्यरत असून त्यातील एका सहायक राजशिष्टाचार अधिकाऱ्याची वर्णी आदित्य ठाकरे यांच्या सेवेत लागली आहे. त्यामुळे महापालिकेच्या राजशिष्टाचार विभागांमध्ये आधीच अधिकारी,कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असताना ज्या काही अधिकाऱ्यांच्या जीवावर हा विभाग चालत होता, त्यातीलच अधिकाऱ्यांना राज्याच्या शिष्टाचार मंत्र्यांच्या दिमतील मंत्रालयात नेण्यात आल्याने महापालिकेच्या राजशिष्टाचार विभागाची ऐशीतैशी होऊन गेली आहे.

( हेही वाचा : मुंबईच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी एकाच नियोजन प्राधिकरणाची गरज, मुख्यमंत्र्यांनंतर आदित्य ठाकरेंचा पुनर्रच्चार )

महापालिकेच्या तिजोरीतून वेतन

मुंबई महापालिकेचे राजशिष्टाचार व संपर्क अधिकारी संदीप लाळगे यांची वर्णी पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयीन कार्यालयात लावण्यात आली आहे. ही नेमणूक महापालिका प्रशासनाने उसणवारी तत्वावर केली असून हे अधिकारी मंत्र्यांच्या कार्यालयात काम करतील आणि त्याचे वेतन हे महापालिकेच्या तिजोरीतून केले जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या राजशिष्टाचार व संपर्क विभाग आंतरराष्ट्रीय संपर्क कक्षात यापूर्वी प्रमुख राजशिष्टाचार व संपर्क अधिकारी यांच्यासह राजशिष्टाचार अधिकारी दोन पदे, सहायक राजशिष्टाचार पदाची ४ अणि इतर शिष्टाचार सहायक ४ पदे अशाप्रकारे एकूण ११ पदे मंजूर असून सध्या या विभागात केवळ राजशिष्टाचार व संपर्क अधिकारी दोन व सहायक राजशिष्टाचार अधिकारी एक अशाप्रकारे केवळ अधिकारीच कार्यरत आहे, तर उर्वरीत सर्व पदे रिक्त आहेत.

प्रमुख राजशिष्टाचार अधिकारी जगदीश दवे यांच्या निवृत्तीनंतर या पदावर कुणाचीही वर्णी लावण्यात आली असून यातील दोन अधिकाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती आणि एक अधिकारी निवृत्त झाल्यानंतर सहायक शिष्टाचार अधिकारी असलेल्या अमित वैती आणि संदीप लाळगे यांना बढती देत राजशिष्टाचार व संपर्क अधिकारीपदाची जबाबदारी सोपवली. परंतु आता यामधील संदीप लाळगे यांची नेमणूक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यालयामध्ये करण्यात आल्याने आता एकमेव अधिकारी व सहायक अधिकारी अशाप्रकारे दोन जण उरले असून या एकमेव अधिकारी आता महापालिकेचा शिष्टाचार कशाप्रकारे सांभाळण्याचा प्रयत्न करणार असा प्रश्न पडला आहे.

महापालिकेत आता राजशिष्टाचार कसा पाळला जाणार

मागील फेब्रुवारी महिन्यामध्ये स्थायी समितीच्या बैठकीत तत्कालिन सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे प्रमुख राजशिष्टाचार व संपर्क अधिकारी यांच्या पदाचे पदनामात केलेला बदल आणि वेतन श्रेणी कमी केल्याबद्दल आक्षेप नोंदवत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीही महापालिका आयुक्तांना पत्र लिहून या विभागातील दोन अधिकाऱ्यांपैकी एकाला प्रमुखपदाचा दर्जा देत जबाबदारी निश्चित करण्याची सूचना केली होती. परंतु प्रशासनाने एकालाही प्रमुखपदाचा दर्जा दिला नाही, उलट एका अधिकाऱ्याला थेट मंत्र्यांच्या दिमतीला पाठवून दिले. त्यामुळे महापालिकेत आता राजशिष्टाचार पाळला कसा जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.