गणपतीला गावाला जाताय? कोकणातील गाड्यांचे बुकिंग फुल्ल

162

गणपती, शिमगा या दोन सणांना अनेक चाकरमानी कोकणाची वाट धरतात. गणपतीला गावी जाण्यासाठी तीन ते चार महिने आधीच रिझर्व्हेशन सुरू होते. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या गणोशोत्सवादरम्यान, प्रचंड मोठी असते. यंदा ३१ ऑगस्ट रोजी गणपतीचे आगमन होणार आहे. त्यामुळे तिकीट बुकींग हे १२० दिवस आधीच सुरु होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. यानुसार बुकिंग सुरू झाल्यावर लगेचच प्रवाशांनी आरक्षण करण्यास सुरूवात केली.

( हेही वाचा : तीन महिन्यांत इतकी रजा घेतली तर ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना द्यावे लागणार फिटनेस सर्टिफिकेट! )

तरच चाकरमान्यांना दिलासा मिळेल

परिणामी कोकणकन्येसह महत्वाच्या गाड्यांचे बुकिंग फुल झाले आहे. कोकणकन्या, मांडवी, मॅंगलोर, जनशताब्दीसह महत्वाच्या गाड्यांना वेटिंग लिस्ट सुरू झाली आहे. ३१ ऑगस्टला गणपती असल्यामुळे चाकरमानी साधारण २० ते २९ ऑगस्टपर्यंत गावी दाखल होतात. आता महत्वाच्या गाड्या फुल झाल्यामुळे तात्काळ डबे जोडले, विशेष व अतिरिक्त गाड्या सोडल्या तरच चाकरमान्यांना दिलासा मिळेल.

विद्युतीकरणामुळे वेग वाढणार 

कोरोनाच्या परिस्थितीमुळे मागच्या दोन वर्षांत निर्बंधांमुळे मोठ्या प्रमाणात लोकांना गावी जाता आले नव्हते. कोकणात होळी आणि गणेशोत्सव हे सण पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात. चाकरमान्यांना आत्तापासूनच गणपतीचे वेध लागले आहेत. त्यात कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे गाड्यांचा वेगही वाढणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.