राजस्थानापासून सुरु झालेल्या उष्णतेच्या लाटांचा प्रभाव विदर्भापर्यंत जाणवत आहे. आता एप्रिल महिन्यात सलग चौथ्यांदा आलेल्या उष्णतेच्या लाटेने चंद्रपूरातील कमाल तापमान थेट ४५ अंशाच्या पुढे नेले. चंद्रपूरात पंचवीस वर्षानंतर एप्रिल महिन्यात कमाल तापमान पहिल्यांदाच ४५ अंशाच्या पुढे जात ४६.४ अंश सेल्सिअसवर स्थिरावले. या अगोदर ३० एप्रिल १९९६ रोजी चंद्रपूरातील कमाल तापमान ४६.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते.
( हेही वाचा : खासगीकरणाच्या निर्णयाला परिचारिका व कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध! )
राजस्थानात तीव्र उष्णतेची लाट सुरु असली तरीही नजीकच्या पाच राज्यांत उष्णतेच्या लाटांचा मारा सुरु आहे. जागतिक नोंदींत राजस्थान नजीकच्या उत्तर प्रदेशातील बांदा शहराला उष्ण शहरांच्या यादीत दुसरा क्रमांक तर चंद्रपूराला पाचवा क्रमांक मिळाला. राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश आणि विदर्भातील कमाल तापमान सध्या सरासरीच्या तीन ते पाच अंशाने जास्त नोंदवले जात आहे.
विदर्भात या आधी एवढ्या उष्णतेच्या लाटा आल्या नव्हत्या, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपने यांनी दिली. मार्च महिन्यामध्ये विदर्भाने पहिल्यांदाच दोन लागोपाठ उष्णतेच्या लाटा अनुभवल्या. एप्रिल महिन्यात चार दिवसांच्या फरकाने चारवेळा उष्णतेच्या लाटांचा झळा पहिल्यांदाच विदर्भाला बसल्या आहेत. विदर्भातील बहुतांश भागांतील कमाल तापमान शुक्रवारी ४५ अंशापर्यंत पोहोचले. त्यावर तातडीने उष्णता प्रतिरोधक उपाययोजना सरकारने कराव्यात, अशी मागणी प्रा. चोपने यांनी केली.
जगभरातील उष्ण शहरांच्या यादीत विदर्भातील शहरांचे स्थान
- चंद्रपूराला ४६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाच्या नोंदीमुळे पाचवे स्थान मिळाले.
- ४५.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानामुळे अकोल्याला नववे स्थान मिळाले.
- ब्रह्मपुरीला दहावा क्रमांक मिळाला. ब्रह्मपुरीतील कमाल तापमान ४५.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.
- ४५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाच्या नोंदीमुळे वर्धा शहराला तेरावे स्थान मिळाले.
४ मे पर्यंत उष्णतेच्या लाटा
विदर्भ आणि नजीकच्या मध्य प्रदेशात अजून पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
Join Our WhatsApp Community