बलात्काराच्या आरोपावरून आधीच अडचणीत सापडलेले भाजप नेते गणेश नाईक, शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यानंतर आता शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी महिलेने मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. परंतु पोलिसांनी शेवाळेंविरोधात गुन्हा दाखल केलेला नाही. या प्रकरणात तपास करत असल्याचे साकीनाका पोलिसांनी म्हटले आहे.
खासदार शेवाळे यांनी फेटाळले आरोप
खासदार राहुल शेवाळे यांनी मात्र आपल्यावरील बलात्काराचे आरोप फेटाळून लावले आहेत. माध्यमांना शेवाळे यांनी सांगितले आहे की, माझ्याविरोधात करण्यात आलेली बलात्काराची तक्रार संपूर्णपणे निराधार आहे. माझी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिमा मलिन करण्याच्या हेतुनेच ही तक्रार करण्यात आली आहे.
(हेही वाचा बेस्ट ऑनलाइन न्यूज पोर्टल पुरस्काराने ‘हिंदुस्थान पोस्ट’चा सन्मान)
तक्रारीमागील सूत्रधार समोर आणू – शेवाळे
बलात्कारांच्या आरोपांबाबत आपण सविस्तर बाजू मांडणार आहोत. मुंबई पोलीस आणि कायद्यावर माझा पुर्ण विश्वास आहे. मी निर्दोष असल्यामुळे कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे. तसेच, माझी बदनामी करण्यासाठी ज्या लोकांनी ही तक्रार केली त्यांचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचे राहुल शेवाळे म्हणाले.
बलात्काराच्या आरोपामुळे रघुनाथ कुचिकही अडचणीत
शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर 22 वर्षीय तरुणीने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. याप्रकरणी गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. या पीडितेला मदत करत तिला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, नंतर आपल्याला कुचिक यांच्याविरोधात वक्तव्य करण्यासाठी चित्रा वाघ यांनी दबाव आणला, असा आरोप पीडितेने केला होता. तसेच, लैंगिक अत्याचाराचे आरोप रघुनाथ कुचिक यांनी फेटाळले आहेत.
Join Our WhatsApp Community