महाराष्ट्र दिन: मराठी माणसाने वाघाच्या जबड्यात हात घालून असा मिळवला महाराष्ट्र

183

महाराष्ट्र देशा

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा, श्रीमहाराष्ट्र देशा

गोविंदाग्रजांनी लिहिलेले हे सुंदर गीत. हा महाराष्ट्र मंगल आहे, पवित्र आहे आणि त्याचबरोबर कठोर आहे आणि तितकाच मृदुल देखील आहे. याचं वर्णन करताना कवी म्हणतात,

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा

महाराष्ट्राचं हे वर्णन अतिशय योग्य आहे. कारण महाराष्ट्राने अनेकांवर प्रेम केलं आहे. इथे विविध जाती-धर्माचे लोक राहतात. या भूमीने सर्वांनाच आपलसं केलं. पण ज्यावेळी महाराष्ट्रावर संकट आलं, त्यावेळी मात्र इथे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महापुरुष जन्मले आणि शत्रूच्या रक्ताने महाराष्ट्र भूमीला अभिषेक चढवला.

( हेही वाचा: 1 मे 1960 ला महाराष्ट्रापासून कसं वेगळं झालं गुजरात? वाचा )

संयुक्त महाराष्ट्र लढा

आपण १ मे दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. खरंतर हा महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी मराठी माणसाला खूप मोठा संघर्ष करावा लागला आहे. यासाठी १०७ हुताम्यांना आपले प्राण गमवावे लागले. चर्चगेट येथील फ्लोरा फाऊंटन येथे हुतात्मा स्मारक आहे. १ मे रोजी इथे अनेक लोक जमतात आणि श्रद्धांजली वाहतात.

पूर्वी महाराष्ट्र आणि गुजरात मिळून एक बॉम्बे स्टेट होते. १९६० रोजी गुजरात राज्य स्वतंत्र करण्यासाठी महागुजरात चळवळ चालवली गेली. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य स्वतंत्र करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली.

गुजराती बोलणार्‍यांचे राज्य गुजरात झाले आणि मराठी बोलणार्‍यांचे राज्य महाराष्ट्र झाले. पण महाराष्ट्रावरील काळे ढग अजूनही पहारा देत होते. गुजराती लोकांचं म्हणणं होतं की मुंबईच्या विकासात गुजरातचा खूप मोठा वाटा आहे, म्हणून मुंबई गुजरातकडे यावी आणि मराठी भाषिकांचं म्हणणं होतं की इथे मराठी बोलणार्‍यांची संख्या जास्त आहे, म्हणून मुंबई महाराष्ट्रात आली पाहिजे.

देशाला स्वातंत्र्य मिळाले पण महाराष्ट्रावर अन्याय

भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. गुजरातच्या निर्माणासाठी महागुजरात असे भलेमोठे आंदोलन उभे राहिले. इंदुलाल याग्निक हे गुजरातचे शिल्पकार मानले जातात. गुजरात राज्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. हे आंदोलन १९५६ रोजी सुरु झाले आणि १ मे १९६० रोजी संपुष्टात आले.

गुजरात आणि महाराष्ट्र अशी दोन राज्ये निर्माण झाली, पण महाराष्ट्र उपेक्षितच राहिला. दिल्लीच्या मनात काही औरच होते. मुंबईला गिळंकृत करण्याचा डाव होता, पण हा नाजुक देश असला तरी कणखर, राकट व दगडांचा देश आहे हे दिल्लीकर विसरले होते. मराठी माणूस हा अन्याय सहन करायला कदापी तयार नव्हता.

मुंबईवर नेहरुंचा डोळा

१९५५ साली फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोग नेमण्यात आले होते. या आयोगाने स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव मांडला. उरलेला भाग मराठी व गुजराती लोकांना द्यावा असे सुचवले. पण या त्रिराज्य सूत्राला प्रचंड विरोध झाला म्हणून कॉंग्रेसने हे त्रिराज्य सूत्र नाइलाजाने फेटाळून लावले.

पुढे १९५६ साली पंडित जवाहरलाल नेहरुंनी मुंबई हा केंद्रशासित प्रदेश होईल, अशी घोषणा केली आणि मराठी माणसाच्या धमन्यातले शिवछत्रपतींचे रक्त सळसळू लागले. नेहरुंना मुंबईचा घास घ्यायचा होता, हे मराठी माणसाने ओळखले आणि नेहरुंना प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले.

१०७ हुतात्म्यांची आहुती

१६ ते २२ जानेवारी या दरम्यान दंगली झाल्या. ठाकूरद्वार बंद करा, असा जमावातून आवाज आला. त्या जमावावर पोलिसांनी गोळ्या झाडल्या. बंडू गोखले या शाळकरी विद्यार्थ्याला गोळी लागली. गोळीबाराची बातमी समजल्यावर शाळा, कारखाने, गिरण्या बंद करण्यात आल्या.

काळे झेंडे दाखवण्यात आले. ठाकूरद्वार ते कांदेवाडी या भागावर लष्कराने ताबा मिळवला. मुख्यमंत्री मोरारजी देसाईंनी भयाण रुप धारण केलं होतं. पुढे दिनांक १८ ला ही चळवळ अत्यंत उग्र झाली. सभांवर बंदी, शाळा, बॅंका इ. सर्व बंद होते. तेही या चळवळीत सामील झाले होते.

बेळगाव, विजापूर, कानडा आणि धारवाड यातले कन्नड भाषिक प्रदेश महाराष्ट्रापासून तोडून आधीच अन्याय झाला होता. आता तर दिल्लीकर प्रेतांचे खच पाडत होते. रक्षण करणारी पोलिसी यंत्रणा भक्षक झाली होती. बेछुट गोळीबार सुरु झाला. पुणे, कोल्हापूर वेळगाव येथेही गोळीबार झाला.

( हेही वाचा: 1 मे महाराष्ट्राचा, मग इतर राज्यांचे वाढदिवस कोणते? वाचा एका क्लिकवर )

महाराष्ट्र युद्धभूमी झाली होती. ज्या महाराष्ट्राने देशाला स्वतंत्र करण्यात सर्वात मोठं योगदान दिलं, त्याच महाराष्ट्रावर नेहरुंचे कॉंग्रेस अनन्वित अत्याचार करत होती. अखेर मराठी माणसाचं रक्त शोषून कॉंग्रेसला नमावंच लागलं. मुंबई महाराष्ट्राला मिळाली, पण त्यासाठी १०७ हुतात्म्यांचा बळी द्यावा लागला. आजही संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरुच आहे. सीमाप्रांत जोपर्यंत महाराष्ट्राला येऊन मिळत नाही तोपर्यंत ही लढाई संपणार नाही.

आज १ मे आहे. कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आपण वाघाच्या जबड्यात हात घालून महाराष्ट्र मिळवला आहे. ही मराठी माणसाची क्षमता आहे. आपण औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रात गाडलेली आहे.

हुतात्मा चौकाला भेट देऊन आदरांजली अवश्य अर्पण करा.

सर्व मराठी माणसाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

जय महाराष्ट्र

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.