भारतात येत्या काही दिवसात तापमानाचा पारा 50 अंशावर जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली. मे महिना हा वर्षातील सर्वात उष्ण महिना असल्याने, पश्चिम राजस्थानच्या काही भागात तापमानाचा पारा 50 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता असल्याची माहिती आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिली. ते एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना बोलत होते.
मे महिन्यात सूर्य ओकणार आग
याप्रसंगी डॉ. महापात्रा यांनी सांगितलं की, पश्चिम-मध्य आणि वायव्य भारतातील बहुतेक भागात कमाल तापमान पारा सरासरी तापमानाच्या अधिक राहणार आहे. ईशान्य भारताच्या उत्तर भागातदेखील सरासरीपेक्षा अधिक तापमानाची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात वायव्य आणि मध्य भारतातील सरासरी कमाल तापमान 35.9 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. गेल्या 122 वर्षांत या ठिकाणी सर्वोच्च कमाल तापमान 37.78 इतके नोंदले होते. राजस्थानमध्ये 1956 साली सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली होती. यावेळी तापमानाचा पारा 52.6 अंशावर पोहोचला होता. यावर्षी देखील मे महिन्यात सूर्य आग ओकणार असून, तापमानाचा पारा 50 अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
( हेही वाचा: महाराष्ट्र दिन: मराठी माणसाने वाघाच्या जबड्यात हात घालून असा मिळवला महाराष्ट्र )
महाराष्ट्रातील पारा चढा
त्यामुळे हवामानतज्ज्ञाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या देशात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज, झाशी आणि लखनऊमध्ये एप्रिल महिन्यात अनुक्रमे 46.8 अंश सेल्सिअस, 46.2 अंश सेल्सिअस आणि 45.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातदेखील तापमानाचा पारा चढा असून विदर्भातील चंद्रपूर या ठिकाणी सर्वाधिक 46.4 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community