मुंबईतील उद्यानांची देखभाल करण्यासाठी महापालिकेच्यावतीने मागवण्यात आलेल्या निविदेमध्ये पुन्हा एकदा कंत्राटदारांनी उणे चाळीसीतच बोली लावली आहे. मात्र, एका बाजुला अंदाजित रकमेपेक्षा ३० ते ३५ टक्के दरात बोली लावणाऱ्या कंत्राटदारांची अनामत रक्कम रद्द करून फेरनिविदा काढण्यात आली. तिथे यावेळी ४० टक्केच्या आसपास कमी दरात बोली लावणाऱ्या कंत्राटदारांकडून दुप्पट अनामत रक्कम स्वीकारुन त्यांना अभय दिले जात आहे. त्यामुळे एकाच महापालिकेतील उद्यान विभागात दोन न्याय कसे लावले जातात असा प्रश्न आता अधिकाऱ्यांना पडला आहे.
निविदा उघडण्यात आल्या
मुंबई महापालिकेच्या सर्व उद्यानांचा विकास करण्यासाठी उद्यान विभागाच्यावतीने निविदा मागवण्यात आली आहे. मनोरंजन मैदान, उद्याने, क्रीडांगणे आदींच्या देखभाल व दुरुस्तीसाठी २३ विभागांमध्ये मागवलेल्या या निविदेमध्ये सरासरी ३५ ते ४० टक्के उणे दराने म्हणजेच कमी दराने निविदांमध्ये कंत्राटदारांनी बोली लावल्या आहेत. महापालिकेने याबाबत मागवलेल्या निविदा ७ एप्रिल रोजी उघडण्यात आल्या आहेत.
( हेही वाचा: देवेंद्र फडणवीस म्हणतात, आमच्या कुटुंबातील मी राजकारणातला शेवटचा व्यक्ती असेल! )
तरीही अनामत रक्कम का जप्त केली जात नाही
यापूवी एक वर्षांकरता मागवलेल्या निविदांमध्ये उणे चाळीस टक्क्यांपर्यंत दर लावल्यामुळे सर्व कंत्राटदारांच्या अनामत रक्कम जप्त केल्या होत्या आणि त्यानंतर निविदा रद्द केल्या होत्या. या फेरनिविदा मागवून पात्र कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आल्या आहेत. मात्र, आगामी वर्षांकरता नेमण्यात येणाऱ्या कंत्राटासाठी पुन्हा कंत्राटदारांनी कमी दरातच बोली लावली आहे. महापालिकेच्या सुत्रांच्या म्हणण्यानुसार, मागील वेळेस कमी दराची बोली लावली म्हणून, जर अनामत रक्कम जप्त होते, तर मग आता तेवढ्याच दरात बोली लावल्यानंतरही निविदा रद्द करून कंत्राटदारांच्या अनामत रक्कम जप्त का होत नाही? परंतु याठिकाणी आधीच २०टक्के कामांचे स्वरुप कमी करून या निविदा मागवल्या असून एवढ्या कमी दरात निविदा आल्यानंतर दुप्पट अनामत रक्कम स्वीकारुन ही निविदा स्वीकारली जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.