केवळ सत्तेसाठी, आमदार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी १०-१५ वर्षे महाराष्ट्रातील जातीजातीत विष कालवले. केंद्रात तुमचे सरकार होते, मग का जेम्स लेनला फरफटत आणले नाही? रामदास स्वामींवर तुम्ही ब्राह्मण म्हणून टीका करणार का? कशाला जातीवरून माथी भडकवता? रामदास स्वामी यांनी शिवरायांवर ज्या शब्दांत लिहिले आहे, तसे अजून कुणी लिहिले नाही. एका पत्रात रामदास स्वामी क्षमा मागतात शिवरायांची. गुरु शिष्याची माफी मागतो का? कुणी सांगितले रामदास स्वामी शिवरायांचे गुरु होते? पवारांना हिंदू या शब्दाची ऍलर्जी आहे. दररोज शाहू, फुले, आंबडेकर यांचा महाराष्ट्र म्हणतात. हो पण हे सगळे याआधी शिवरायांना पुजायचे. अठरा पगड जातींना घेऊन शिवरायांनी राज्य स्थापन केले. मतांसाठी विष कालवले, आमदार निवडून येण्यासाठी हे राजकारण सुरु केले. आज ते शाळा- महाविद्यालयांत पोहचले बघा. याच्यासाठी जातीचे राजकारण केले. या अशा महाराष्ट्राचा दिवस साजरा करायचा का आम्ही? असा सणसणीत टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील जाहीर सभेत शरद पवारांना लगावला.
(हेही वाचा एकदा काय ते होऊनच जाऊदे! महाराष्ट्राच्या मनगटाची ताकद दाखवून द्या! राज ठाकरेंचा भोंग्यांवरून इशारा)
प्रबोधनकार हिंदुत्ववादीच होते, पवारांनी सोयीचे वाचेल
पवार म्हणतात मी प्रबोधनकार वाचले पाहिजे. पवारांनी प्रबोधनकार सोयीचे वाचले आहेत. प्रबोधनकार हिंदू धर्म मानणारा, पूजा करणारा माणूस होता. ते भट भिक्षुकीच्या विरोधात होते, पण देव मानणारे होते. त्यामुळे त्याचे संदर्भ मी इथे देत आहे. प्रबोधनकारांची पुस्तके आणि त्याचे संदर्भ आणले आहेत. ‘माझी जीवनगाथा’ हे त्यांचे चरित्र आहे, त्यात पान क्रमांक १०१ वर ख्रिस्ती मिशनरींविरुद्ध संघटना त्यांनी स्थापन केली. नवरात्रोत्सव सार्वजनिक केला. उठ मराठा उठ पुस्तक पवारांनी वाचावे. महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने शरद पवारांनी विष कालवले. कालपर्यंत स्वतःची जात सगळ्यांना प्रिय होती, पण दुसऱ्या जातीचा द्वेष राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सुरु झाला. जेम्स लेनची पुस्तके काढली आणि ज्यांनी शिवरायांना घराघरात पोहचवले त्या बाबासाहेब पुरंदरेंना वृद्धपकाळात छळायला सुरुवात केली. कशासाठी तर जातिद्वेषासाठी. रायगडाची समाधी कोणी बांधली, लोकमान्य टिळकांनी बांधली, मग त्यांना ब्राह्मण म्हणणार का? त्यांनी पहिले वर्तमानपत्र काढले त्यांचे नाव मराठा होते, हे पवार सांगत नाही. इतके वर्षे तुम्ही सत्तेत होते, मग खेचून आणायचे होते जेम्स लेनला. खडसावून विचारायचे होते. त्याच्यावरून तुम्ही १०-१५ वर्षे राजकरण केले. तो जेम्स लेन म्हणतो, मी असे म्हणालोच नाही. मग कशाला तुम्ही महाराष्ट्राची माथी भडकावली, असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला.
(हेही वाचा बाबरी पाडली तेव्हा तिथे शिवसेनेचा एकही नेता नव्हता! देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट)
शरद पवार नास्तिक, मी बोलल्यावर देव देव करतात!
आज काय महाराष्ट्राची परिस्थिती आहे. रोज आमचे नेते वाट्टेल ते बरळतात. पुढची पिढी पाहत असेल, तर काय शिकत असेल. सगळ्या प्रकारचे विचार या महाराष्ट्राने दिले आणि तोच महाराष्ट्र खड्ड्यात जातोय. याच्यासाठी महाराष्ट्र दिन साजरा करायचा का? आज काय महाराष्ट्राची हालत केली आहे? आई-बहिणी वरून शिव्या घालत आहेत. राज ठाकरे यांचे भाषण आहे. हल्ला गुल्ला करा आणि निघून जा, इथेच आपण मार खातो. माझी दोन भाषणे काय झाली, सगळे फडफडायला लागले. शरद पवार म्हणतात, मी दोन धर्मात दुही माजवतो. तुम्ही जातीजातीत भेद करता, तेथून दुही माजते. शरद पवारांनी कधी तरी शिवरायांचा उल्लेख केला होता का? आता बोलायला लागले आहेत. जेव्हा मी यावर बोललो. आता व्हिडीओ फिरवत आहेत, गीत रामायण ऐकत आहेत आणि बाजूला शिवरायांचे पुस्तक आहे. त्या दिवशी मी म्हणालो, पवार नास्तिक आहे. केवढे झोम्बले. लागले देवासोबत फोटो काढायला. शरद पवार, तुमची मुलगीच संसदेत म्हणाली होती कि, तिचे बाबा नास्तिक आहेत, मग कशाला देवासोबत फोटो काढत पुरावे देत आहात, अशी विचारणाही ठाकरे यांनी केली.
Join Our WhatsApp Community