एसी लोकल आणि फर्स्ट क्लासचे तिकीट दर कमी करण्यात आल्यानंतर आता पासचे दर देखील कमी होतील, अशी सर्वसामान्यांना आशा आहे.
पण पासच्या दरात कपात करणे अशक्य असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना एसी लोकल आणि फर्स्ट क्लासच्या पाससाठी पूर्वीप्रमाणेच पैसे मोजावे लागणार आहेत.
खर्च करण्याची क्षमता वाढवणे आवश्यक
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.के. त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. रेल्वेकडून प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी होणारा खर्च सुद्धा जास्त आहे. त्यामुळे चांगल्या सुविधा मिळवण्यासाठी खर्च करण्याची क्षमता आपण वाढवली पाहिजे, असे त्रिपाठी यावेळी म्हणाले. दर कमी केल्यास किंवा जास्तीत जास्त सवलती दिल्यास आपल्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येईल, असेही त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ नागरिकांची ही सुविधा बंद होणार?
मेल तसेच एक्स्प्रेस गाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिकिटाच्या मूळ दरांत 50 टक्के सवलत देण्यात येत होती. कोरोना काळात गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ही सवलत तात्पुरती बंद केली होती. पण ही सेवा आता पुन्हा सुरू करण्याबाबत अजून कुठलाही विचार केला नसल्याचे त्रिपाठी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ही सुविधा बंद होण्याची अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community