यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासून राज्याच्या पश्चिम किनारपट्टीला भेट देणा-या पाच मादी ऑलिव्ह रिडले कासवांना भारतीय वन्यजीव संस्था आणि राज्य वनविभागाच्या कांदळवन कक्षाने सेटलाईट टॅगिंग केले. यातील रेवा या मादी ऑलिव्ह रिडलेसोबतच सॅटलाईट टॅगिंग झालेली वनश्री देखील राज्याला वार्षिक भेट देत असल्याचा अंदाज भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रत्र डॉ आर सुरेशकुमार यांनी व्यक्त केला.
दोघींची यंदाच्या ऋतुमानातील शेवटची वेळ!
रेवा आणि वनश्री यांना फेब्रुवारी महिन्यात गुहागर येथून सॅटलाईट टॅगिंग करुन समुद्रात सोडले गेले. त्यानंतर रेवाने दक्षिणेकडे एका सरळ रेषेत प्रयाण केले. ती पुन्हा कधीच राज्याच्या किना-यावर अंडी घालण्यासाठी आली नाही. दोन महिन्यांच्या काळात ती कर्नाटकातील समुद्रकिना-याजवळ पोहोचली आणि आता तिथून अरबी महासागरातील खोल समुद्राकडे जायला लागली आहे. तिचा भ्रमणमार्ग बदलल्याची माहिती शनिवारी स्पष्ट झाली. किनारपट्टीजवळ राहिल्यानंतर तेथील अन्न रेवासाठी आता फारसे उरले नसल्याची माहिती डॉ आर सुरेशकुमार यांनी दिली.
(हेही वाचा – सॅटलाईट टॅगिंग केलेल्या कासवांना ‘या’ भागांत मिळतेय पुरेसे खाद्य!)
रेवासह वनश्रीही सातत्याने दक्षिणेतील समुद्रातच वाटचाल करत आहे. वनश्रीनेही गुहागरला अंडी घातल्यानंतर पुन्हा राज्याला भेट दिलेली नाही. कदाचित दोघींनी या अगोदर अंडी घातली असावी आणि दुस-यांदा गुहागरची अंडी घालण्याची दोघींचीही यंदाच्या ऋतुमानातील शेवटची वेळ असावी, असाही अंदाज डॉ आर सुरेशकुमार यांनी व्यक्त केला.
गुजरात राज्यातील समुद्राला पसंती देणारी प्रथमा परततेय
गेल्या महिन्याभरापासून गुजरात राज्यातील खोल समुद्रात राहणारी प्रथमा ही पहिली ऑलिव्ह रिडले आता दीवच्या किनारपट्टीभागाच्या जवळ आढळून येत आहे. प्रथमाने उत्तरेकडील आगेकूच थांबवली असून आती ती दक्षिणेकडे परत येत असल्याचे नुकत्याच केलेल्या पाहणीतून दिसून आले. काही कालावधीनंतर प्रथमा पुन्हा दक्षिणेकडे परतेल, अशी आशा डॉ आर. सुरेशकुमार यांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community