राज्यावर चौथ्या लाटेचे संकट ओढावलेले असताना सोमवारी नव्या ९२ रुग्णांमुळे राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या आता हजारीपार पोहोचली आहे. कोरोनाचे १ हजार १६ रुग्ण राज्यातील विविध भागांत उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शंभरहून अधिक रुग्णांना दर दिवसाला डिस्चार्ज दिले जात होते. त्यातुलनेत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दर दिवसाला शंभर ते दीडशे रुग्णांपर्यंत आढळत होती. काही आठवड्यांपूर्वीच राज्यातील रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले होते. एप्रिल महिन्याच्या शेवटाला मुंबई, ठाणे, पुणे आणि अहमनगर येथील वाढत्या रुग्णसंख्येबाबतही आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली होती. सोमवारी राज्यात ९२ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्या तुलनेत केवळ ७० रुग्णांनाच डिस्चार्ज दिला गेला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्क्यांवर कायम असल्याने घाबरण्याचे कारण नाही, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
( हेही वाचा : पेन्शनधारकांचा चेहराच ठरणार आता हयातीचा दाखला! )
जनुकीय चाचण्या आणि लसीकरणावर भर
नव्या रुग्णांच्या नोंदीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोणता नवा विषाणू आढळून येत आहे का, याचा मागोवाही आरोग्य विभागाने घ्यायची तयारी दाखवली आहे. तशा सूचना स्थानिक पातळीवर दिल्या गेल्या आहेत. त्यासह लसीकरण आणि बूस्टर डोसचे कमी झालेले प्रमाण याकडे लक्ष देण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत.
जिल्हानिहाय कोरोनाची वाढती संख्या –
- मुंबई – ६२९
- पुणे – २१५
- ठाणे – ८१
- अहमदनगर – १६
- रायगड – १२