पुण्यात दहशतवादविरोधी पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात साधारण १२ लाखांचे म्याव म्याव ड्रग्स म्हणजेच मेफेड्रोन ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशन परिसरात ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये एका अंमलीपदार्थ तस्कराला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याकडून ११ लाख ८० हजार रुपयांचे ११८ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. महंमद फारुख महंमद उमर टाक असे अटक केलेल्या तस्कराचे नावं असून तो मूळचा राजस्थानचा असल्याने राजस्थान कनेक्शनचा पर्दाफाश झाला आहे.
काय आहे प्रकरण
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आलेल्या मुंबईतील एकाला राज्य दहशतवादविरोधी पथकाने पकडले आहे. त्याच्याकडून ११ लाख ८० हजार रुपयांचे ११८ ग्रॅम एम डी (मेफेड्रोन) जप्त करण्यात आले. महंमद फारुख महंमद उमर टाक (वय ४३, रा. म्हाडा कॉलनी, अंधेरी पश्चिम, मुंबई, मूळ रा. राजस्थान) असे अटक केलेल्या अमली पदार्थ तस्कराचे नाव असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – शेलारांचा हल्लाबोल! म्हणाले, “शिवसेना हे फाटकं बनियान”)
पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरातील मालधक्का चौका रस्त्यावर एक जण येणार असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार दहशतवाद विरोधी पथकाने तेथे सापळा रचून महंमद टाक याला पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ११ लाख ८० हजार रुपयांचे ११८ ग्रॅम एम डी अंमली पदार्थ सापडले. त्याच्याकडून मोबाईल, डिजिटल वजन काटा, २ हजार ५९० रुपये रोख, आधारकार्ड, डेबिट कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला अशी माहिती देखील दहशतवाद विरोधी पथकाने दिली आहे.